माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदच्या पावलावर पाऊल टाकून अनेक मुले गेल्या दोन दशकांत बुद्धिबळाकडे वळली आहेत. यांतील काही आनंदचा वारसदार बनण्याच्या दिशेने प्रगती करत आहेत. चेन्नईचा ग्रँडमास्टर भास्करन अधिबान हा अशा नवोन्मेषी बुद्धिबळपटूंपैकी एक. नुकताच त्याने २७०० एलो गुणांचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला. म्हणजे त्याची संभावना आता ‘सुपर ग्रँडमास्टर’ अशी होऊ शकेल. कझाकीस्तान येथे झालेल्या जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत त्याने भारताचे नेतृत्व केले. या स्पर्धेत भारताचे पदक थोडक्यात हुकले, तरी अधिबानने वैयक्तिक पदक जिंकले आणि भरपूर एलो गुणांची कमाईदेखील केली. त्याच्याच जोरावर त्याला २७०० गुणांचा टप्पा गाठता आला. सध्या जागतिक क्रमवारीत त्याचे स्थान ४१वे आहे. त्याच्या पुढे विश्वनाथन आनंद (एलो २७७४, जा. क्र. ६), पेंटाल्या हरिकृष्ण (एलो २७२३, जा. क्र. २९) आणि विदित गुजराथी (एलो २७१७, जा. क्र. ३२) असे तिघे भारतीय आहेत. या तिघांशिवाय आजवर केवळ कृष्णन शशिकिरणलाच २७०० एलो गुणांपलीकडे जाता आले होते. आता अधिबान पाचवा.

सध्या विदित गुजराथी आणि भास्करन यांना आनंदप्रमाणेच मोठय़ा स्पर्धाची निमंत्रणे मिळू लागली आहेत. अधिबानने मे महिन्यात आइसलँडमधली रायक्येविक स्पर्धा जिंकली. तत्पूर्वी जिब्राल्टरमधील स्पर्धेत त्याची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती. पण गेल्या वर्षांच्या अखेरीस क्रोएशियातली एक स्पर्धा त्याने जिंकली. एक अत्यंत आक्रमक आणि निर्भय बुद्धिबळपटू अशी त्याची ओळख आहे. बुद्धिबळजगतात त्याला ‘बीस्ट’ असे संबोधले जाते. मॅग्नस कार्लसन, वेस्ली सो अशा अव्वल बुद्धिबळपटूंविरुद्ध खेळतानाही अधिबान पूर्णपणे वेगळी ओपनिंग खेळतो आणि वेगळ्या चाली रचतो. सहसा अशा बुद्धिबळपटूंविरुद्ध आपली बाजू भक्कम करून बरोबरी साधण्याकडे बहुतेक बुद्धिबळपटूंचा कल असतो. पण अधिबान अशांपैकी नाही. त्याला पाहिजे तो ओपनिंग अधिबान खेळतो. सातत्य हे त्याचे सामथ्र्य नाही. त्यामुळे काही स्पर्धामध्ये त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नाही. परंतु अशा अपयशांमुळे निराश न होता, प्रत्येक वेळी नवीन उमेदीने खेळत राहणे हे अधिबानचे प्रमुख वैशिष्टय़ आहे.

२०१७मधील टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत अधिबानला तळाचे मानांकन होते. तरीही माजी जागतिक आव्हानवीर सर्गेई कार्याकिन, आनंदचा एके काळचा साहाय्यक राडोस्लाव्ह वोयतासेक अशा मातब्बर बुद्धिबळपटूंना हरवत अधिबानने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. ती त्याची आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली. २०१४मध्ये बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने कांस्यपदक जिंकले, जे ऐतिहासिक होते. या विजयात ११ पैकी ७ गुण मिळवत अधिबानने अमूल्य योगदान दिले. बॉबी फिशर, मिखाइल ताल, विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन हे त्याचे आदर्श. निराश न होण्याची सवय त्याला त्याच्या आईने लावली. भविष्यात आणखी मोठी उद्दिष्टे गाठताना हा गुण त्याच्यासाठी आणि त्याच्या प्रतिस्पध्र्यासाठीही निर्णायक ठरू शकेल!

 

Story img Loader