‘पूर्व पाकिस्तान’च्या निर्मितीला कारणीभूत झालेल्या फाळणीच्या वेदना उराशी बाळगतानाच ज्यांच्या साहित्याची ती प्रेरणा ठरली अशा लेखकांपैकी एक म्हणजे अतिन बंदोपाध्याय. त्यांच्या निधनाने एक सिद्धहस्त लेखक आपण गमावला हे तर खरेच, पण त्या काळाच्या भाष्यकारांतील एक दुवा निखळला आहे. अतिन यांचे बंगाली साहित्य हे बिभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या ‘पाथेर पांचाली’ची जी साहित्य प्रेरणा होती त्याच्याशी नाते सांगणारे होते. बंगाली लेखक सय्यद मुस्तफा सिराज यांनी अतिन यांच्या ‘नीलकांठा पाखीर खोंजे’ या साहित्यकृतीची तुलना ग्रीक शोकांतिकांवर आधारित अभिजात साहित्याशी केली होती यावरून त्यांच्या लेखनाचा आवाका लक्षात येतो. अतिन बंदोपाध्याय यांचा जन्म ढाक्यातला. वाणिज्य शाखेतून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी रोजीरोटीसाठी खलाशी, ट्रक क्लीनर, प्राथमिक शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक अशी अनेक कामे उमेदीच्या काळात केली, पण ती करीत असताना त्यांच्यातील साहित्यिक त्यांनी विझू दिला नाही. आबाशर या नियतकालिकातून त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली होती, त्यानंतर त्यांचा लेखनप्रवास अनेक दशके अखंडपणे सुरूच राहिला. १९७० च्या दशकात, मुर्शिदाबाद जिल्हय़ातील चौरीगाचा या छोटय़ा गावातील हायस्कूलचे ते मुख्याध्यापक होते. नंतर १९८६ मध्ये ते कोलकात्यात स्थायिक झाले. तेथेही त्यांनी कारखाना व्यवस्थापक, प्रकाशन सल्लागार व पत्रकार अशी वेगवेगळी कामे केली. नीलकांठा पाखीर खोंजे, मानुशेर घरबाडी, अलौकिक जलजन, ईश्वरेर बागान हे फाळणीवरचे कादंबरीचतुष्टय़ त्यांनी लिहिले. अविभाजित बंगालमधील ढाक्यात जन्म झाल्यानंतर १९४७ मध्ये पूर्व पाकिस्तानामधून बंदोपाध्याय यांनी भारतात स्थलांतर केले, मातृभूमीपासून तुटण्याचा  अनुभव प्रत्यक्ष घेतलेला असल्याने तो प्रभावीपणे मांडण्यात त्यांच्या प्रतिभेस यश आले. त्या काळातील हिंदू-मुस्लीम दंगली, लोकांच्या मनातील  कधी आशा, कधी निराशा यांचे हिंदोळे त्यांनी टिपले. २००१ मध्ये त्यांच्या पंचषष्टी गाल्पो या लघुकथा संग्रहाला मानाचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ मिळाला. त्यांच्या बहुतेक सर्वच लेखनातून पश्चिम बंगालच्या ग्रामीण जीवनाचे जिवंत शब्दचित्र वाचकांसमोर उभे राहते. नील तिमी, एकती जलेर रेखा ही त्यांची इतर पुस्तकेही वाचकप्रिय ठरली. त्यांनी मुलांसाठीही लेखन केले.

Story img Loader