ब्रायनला सतत ताप येत होता, पण रोगाचे निदान होत नव्हते. गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात. त्यातूनच मग तो व त्याच्या मित्रांनी वैद्यकशास्त्राची पुस्तके तर धुंडाळली, शिवाय तो संगणक अभियंता असल्याने त्याला तंत्रज्ञानाची बाराखडी चांगली अवगत होती. त्यातूनच त्याने एक उपकरण शोधून काढले, त्याने या उपकरणाने रक्ताची चाचणी केल्यानंतर तो मलेरिया असल्याचे निष्पन्न झाले. ब्रायन गिट्टा हा २४ वर्षांचा युगांडाचा संशोधक आहे. त्याने रक्ताची चाचणी करण्यासाठी जे उपकरण शोधले आहे त्याला आफ्रि केचा अभियांत्रिकी नवप्रवर्तनाचा पुरस्कार मिळाला आहे.  या उपकरणाचे नाव ‘माटिबाबू’. त्याचा स्वाहिली भाषेतील अर्थ ट्रीटमेंट म्हणजे उपचार.

ब्रिटनच्या रॉयल अकॅडमी फॉर इंजिनीअरिंगचा हा पुरस्कार असून तो तंत्रज्ञानाचा मानवी विकासासाठी वापर करण्यासाठी दिला जातो. ब्रायन हा पुरस्कार मिळवणारा सर्वात तरुण संशोधक. रक्त न काढता मलेरियाची चाचणी करण्याचे उपकरण त्याने शोधले आहे. मलेरिया म्हणजे हिवताप हा युगांडात जास्त आढळणारा रोग आहे.  ब्रायनने शोधलेले उपकरण कु णीही वापरू शकेल असे व किफायतशीर आहे. हे उपकरण रुग्णाच्या बोटांना लावले जाते, ते वापरण्यासाठी कु णा तज्ज्ञाची गरज लागत नाही. या उपकरणातून लाल रंगाचा किरण रुग्णाच्या बोटावर टाकला जातो. त्यात लाल रक्तपेशी दिसत असतात. त्यामुळे योग्य तो संदेश स्मार्टफोनला पाठवला जातो. त्यातून रोगनिदान केले जाते. एरवी मलेरियाचे निदान करण्यासाठी रक्ताच्या चार चाचण्या केल्या जातात, यात केवळ एका चाचणीत काम भागते.  गिट्टा व त्याचे सहकारी हे कंपालातील माकेरे विद्यापीठाचे विद्यार्थी. एखादी समस्या हीच प्रेरणा समजण्याचा धडा त्यांनी विद्यार्थी म्हणून घेतला होता. त्यातूनच त्यांनी माटिबाबूचा शोध लावला. यात रक्तपेशींचा रंग, आकार व संहती लगेच कळते. रोगनिदानाचा निष्कर्ष तुमच्या स्मार्टफोनवर येतो. या शोधात ८० टक्के अचूक निष्कर्ष मिळतात. नंतर ते प्रमाण ९० टक्क्यांवर जाणार आहे. अभियांत्रिकीच्या माध्यमातून वैद्यकातील प्रश्न सोडवताना मानवी विकासाला स्पर्श करणारे हे संशोधन मानवतेसाठी वरदान आहे. हे उपकरण बाजारात येईल तेव्हा त्याची किंमत १०० डॉलर्सच्या आसपास राहील, शिवाय हे उपकरण पुन्हा वापरता येणारे आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कंपन्यांकडून त्याच्याकडे प्रस्ताव आले. त्यामुळे पुरस्काराचा आनंद त्याला साजरा करता आला नाही, पण या शोधातून ठोस असे काही तरी बाहेर पडावे व कुणी तरी त्याचे व्यावसायिक उत्पादन करावे अशी ब्रायनची इच्छा आहे. एकूणच त्याचा हा शोध आफ्रिकेतील मागास देश व विकसनशील देशांसाठी वरदान ठरणार आहे.

Story img Loader