भौतिकशास्त्रातील कणभौतिकी शाखेने आतापर्यंत विश्वाच्या उत्पत्तीचे कोडे उलगडण्याच्या दिशेने मोठी वाटचाल केली आहे. त्यात युरोपातील सर्न प्रयोगात हिग्ज बोसॉनसारखे गुणधर्म असलेला कण शोधण्यापर्यंत आपण मजल मारली, पण यात पायाभूत काम फार पूर्वीपासून सुरू झाले. त्यात अणूतील एकेक उपकणांचा शोध लागत गेला. बर्टन रिश्टर या भौतिकशास्त्रज्ञाचाही यात मोठा वाटा होता.
१९७६ मध्ये चार्म क्वार्क नावाच्या नव्या अणू उपकणांचा शोध लागला होता, त्यात रिश्टर यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले. त्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार विभागून मिळाला होता. आपले विश्व ज्या द्रव्याचे बनलेले आहे त्याच्या आकलनात या शोधाने मोठी भर टाकली होती. द्रव्याचा अधिक सखोल अभ्यास यात शक्य झाला. अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठात ते प्रदीर्घ काळ प्राध्यापक होते. सरकारच्या विज्ञान धोरणांवर सकारात्मक उद्दिष्टांसाठी प्रभाव टाकण्याचे काम केले, त्यातूनच त्यांनी हवामान बदलांच्या अलीकडे चर्चेत असलेल्या प्रश्नावर पुस्तकही लिहिले होते. स्टॅनफर्डमधील उच्च ऊर्जा कण त्वरणक व प्रगत कण शोधक अशा दोन यंत्राची रचना, उभारणी व नवीन कणांच्या शोधातील योगदान एवढी मोठी कामगिरी त्यांनी केली. १० नोव्हेंबर १९७४ रोजी त्यांनी भौतिकशास्त्रात मूलभूत संशोधन करताना अशा एका कणाचे अस्तित्व शोधून काढले ज्याचे गुणधर्म वेगळे होते. त्याला नंतर ‘चार्म क्वार्क’ असे नाव देण्यात आले. या कणांच्या शोधातून द्रव्याच्या रचनेविषयी नवीन सिद्धांताला त्यामुळे पाठबळ मिळण्यास मदत झाली. त्या वेळी त्यांनी या कणाचा लावलेला शोध नोव्हेंबर क्रांती म्हणून ओळखला गेला होता. त्याच वेळी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे भौतिकशास्त्रज्ञ सॅम्युअल सी. सी. टिंग यांनीही हेच गुणधर्म असलेल्या कणाचे संशोधन केले होते. रिश्टर व टिंग यांना १९७६ मध्ये या शोधासाठी नोबेल मिळाले.
रिश्टर यांचा जन्म न्यूयॉर्कमधला. वडील कपडा कामगार, आई गृहिणी. तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता, त्यामुळे नेहमीच दिवे मालवले जात (ब्लॅकआऊ ट). त्यात डोक्यावरचे आकाश स्वच्छ दिसायचे. त्यातून त्यांच्यात आकाशगंगा व विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण झाले. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून पीएच.डी. केल्यानंतर ते स्टॅनफर्डमध्ये प्राध्यापक झाले. तेथील ऊर्जा प्रयोगशाळेचे नेतृत्व केले. २०१४ मध्ये त्यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेचे विज्ञान पदक मिळाले होते. अनेक विज्ञान संस्थांचे ते मानद सदस्यही होते. त्यांच्या निधनाने विश्वाच्या व अणूच्या अंतरंगात डोकावणारा एक प्रतिभाशाली वैज्ञानिक काळाच्या पडद्याआड गेला आहे.