स्वातंत्र्योत्तर काळात गणिताच्या क्षेत्रात केवळ संशोधनच नव्हे, तर त्या विषयाला वाहिलेली एक संस्था नावारूपाला आणून देशाची गणिती परंपरा पुढे नेणारे गणितज्ञ सी. एस. शेषाद्री यांच्या निधनाने गणितातील भारतीय परंपरेचा महत्त्वाचा दुवा निखळला आहे. शेषाद्री यांना पद्मभूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, रॉयल सोसायटीची विद्यावृत्ती, अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीची विद्यावृत्ती प्राप्त झाली होती. संशोधन आणि अध्यापन या दोन्ही पातळ्यांवर त्यांनी भरीव काम केले. ‘चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटय़ूट’ या संस्थेची उभारणी करून अनेक बुद्धिमान तरुणांना गणिताकडे वळवले.
शेषाद्री यांचा जन्म कांचीपुरमचा. शिक्षण चेन्नई व मुंबई येथे झाले. १९५७ मध्ये ते पॅरिसला गेले अन् त्यानंतर बीजगणितीय भूमितीकडे वळले. ही शाखा गणिताच्या अनेक शाखांना कुठेना कुठे छेदतेच, त्यामुळे तिचा अभ्यास त्यांना महत्त्वाचा वाटला. फ्रेंच गणितज्ञ आंद्रे वेल व हेन्री पॉइनकेअर यांचा प्रभाव त्यांच्यावर होता. १९६० मध्ये पॅरिसहून परत आल्यानंतर ते टाटा मूलभूत संशोधन संस्थेत रुजू झाले. पुढे १९८०च्या दशकात शेषाद्री हे चेन्नईतील इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस या संस्थेत काम करीत असताना त्यांना एसपीआयसी सायन्स फाऊंडेशन या संस्थेने गणितीय संस्था स्थापन करण्यास सुचवले. त्यावरून शेषाद्री यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटय़ूटची स्थापना केली. त्यांचे तेव्हाचे अनेक सहकारी हे आज गणित व संगणकशास्त्रात आघाडीवर असून परदेशात कार्यरत आहेत; पण शेषाद्री यांचे वेगळेपण म्हणजे त्यांनी देशातच राहून विद्यार्थी घडवले. शेषाद्री यांचा साधेपणा, मनमोकळेपणा, जीवनावरचे प्रेम, उत्कृष्टतेचा ध्यास यामुळे अनेक जण प्रभावित होत असत. आधुनिक गणितातील बीजगणितीय भूमिती हा त्यांचा संशोधनाचा प्रांत. त्याचा वापर सांख्यिकी, रोबोटिक्स, कोडिंग व सैद्धांतिक भौतिकशास्त्रात होतो. ‘नरसिंहन-शेषाद्री सिद्धांत’ त्यांनी त्यांचे मित्र नरसिंहन यांच्या मदतीने १९६५ मध्ये विकसित केला. तो क्षेत्र सिद्धांत व सूत्र सिद्धांतात पायाभूत मानला जातो. शेषाद्री व नरसिंहन यांच्या संशोधनातूनच पुढे ‘शेषाद्री स्थिरांक’ अस्तित्वात आला. आपल्या संशोधनाने त्यांनी गणिताची परंपरा पुढे नेली व त्याचा सांधा संगणकशास्त्र व इतर आधुनिक विज्ञान शाखांशी जोडणारे अभ्यासक्रम सुरू केले. त्यांनी केलेली ही कामगिरी पायाभूत अशीच आहे.