तामिळ चित्रपटसृष्टीत सर्वच निर्मात्यांकडून सी. व्ही. राजेंद्रन यांना दिग्दर्शक म्हणून मागणी होती. त्यातूनच तीन दशके त्यांनी तमिळ, कन्नड, मल्याळम्, तेलुगू आणि हिंदी अशा भाषांतून चित्रपट केले. शिवाजी गणेशन व जयललिता या जोडीला एकत्र आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. या राजेंद्रन यांचे नुकतेच निधन झाले. दिवंगत सी. व्ही. श्रीधर यांच्या युनिटमध्ये ते काम करीत असत, श्रीधर हे त्यांचे चुलतबंधू. त्यांचे बहुतांशी चित्रपट तमिळ होते. त्यातही गलाटाकल्याणम्, सुमथी एनसुंदरी, पून्नून्जल हे चित्रपट विशेष गाजले. चित्रपटसृष्टीत मोठी स्पर्धा असूनही त्यांनी कधी कुणाचा मत्सर केला नाही, हा त्यांचा स्वभावविशेष.
राजेंद्रन हे मूळचे मधुरानथंगमजवळील चित्तमूरचे. चित्रालय गोपू यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांचे संवाद लिहिले. गोपू यांच्याशी ते नेहमी गप्पा मारत असायचे. मींडा सोर्घम या चित्रपटासाठी त्यांनी प्रथम सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. श्रीधर यांच्याच कथालिका नेरामिलाई या चित्रपटाच्या दिग्दर्शनातही ते सहायक होते. राजेंद्रन हे श्रीधर यांच्या युनिटमधील उत्तम तंत्रज्ञही होते. त्यानंतर युनिटमधील अनेक जण काळाच्या पडद्याआड गेले तरी राजेंद्रन यांनी मल्याळम् व कन्नड चित्रपटांचे दिग्दर्शन सुरू ठेवले. अनुभवम पुडुमाई या चित्रपटापासून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी कलत्ता कालयनम या चित्रपटात शिवाजी गणेशन व जयललिता यांना प्रथम एकत्र आणले. नील कावनी कदाली या कमी खर्चाच्या चित्रपटातही ही जोडी एकत्र होती. हा चित्रपट चांगलाच हिट झाला. शिवाजी गणेशन यांचा मुलगा प्रभू याला त्यांनीच ‘सांगिली’ या चित्रपटात संधी दिली. शिवाजी गणेशन हे त्यांच्या किमान २० चित्रपटांत प्रमुख भूमिकेत होते. गाण्यांना कथेइतकेच महत्त्व देणाऱ्या राजेंद्रन यांच्या चित्रपटांतील अनेक गाणी संस्मरणीय ठरली. जयललिता यांच्या मृत्यूच्या एक वर्ष आधी त्यांच्या गाण्यांवर आधारित थेन किन्नम हा कार्यक्रम त्यांनी ‘जया टीव्ही’साठी केला. त्या वेळी लगेचच जयललितांनी राजेंद्रन यांना दूरध्वनी करून त्यांचे कौतुक केले होते.
जयललिता, रजनीकांत, कमल हासन, राजकुमार, जितेंद्र, जयशंकर, विष्णुवर्धन, व्ही. रविचंद्रन, श्रीनाथ अशा अनेक कलाकारांबरोबर त्यांनी काम केले. पावा मानिपू व राजा हे त्यांचे शिवाजी गणेशन यांच्याबरोबरचे दोन चित्रपट पुन्हा मोठय़ा पडद्यावर प्रदर्शित होणार होते पण त्याआधीच त्यांचे निधन झाले.