शोधपत्रकारिता हा फार वेगळा विषय आहे, त्याला खूप चिकाटी व संयम लागतो. शोधपत्रकारिता म्हणजे केवळ भ्रष्टाचार व राजकीय प्रकरणे इतकाच मर्यादित अर्थ नसतो, त्याला सामाजिक अंगही असते. त्यामुळे शोधपत्रकारितेतून पुढे साहित्य लेखनाकडेही वळता येते व त्यातून अत्यंत प्रभावी साहित्यकृती जन्माला येऊ  शकतात. विशेष करून पाश्चात्त्य देशात अशा माध्यमातून पुढे आलेले लेखक व  लेखिका आहेत. त्यातीलच एक तान्या तलागा. त्यांना नुकताच ‘सेव्हन फॉलन फीदर्स- रेसिझम, डेथ अँड हार्ड ट्रथ्स इन नॉर्दन सिटी’ या पुस्तकासाठी शॉनेसी कोहेन पुरस्कार मिळाला आहे. तो राजकीय लेखनासाठी आहे.

ज्या भागात तान्या यांचे बालपणी वास्तव्य होते त्याच भागातील मूळ निवासी लोकांची शाळेत जाणारी सात मुले बेपत्ता होतात व नंतर त्यांचे मृतदेह सापडतात अशी यातील कथा. तान्या या कॅनडातील टोरांटो स्टार या वृत्तपत्राच्या प्रतिनिधी आहेत. त्यांना याच पुस्तकासाठी आधी आरबीसी टेलर पुरस्कारही मिळाला होता. ओंटारिओतील थंडर बे येथील रहिवाशांच्या ‘कॅनडातील राष्ट्रीय निवडणुकीत ते मतदान का करीत नाहीत’ याबाबत मुलाखती घेण्यासाठी त्या गेल्या असताना तेथील ग्रामप्रमुखाने त्यांना प्रश्न केला की तुम्ही या सगळ्याची बातमी कशासाठी करता. त्यापेक्षा आमच्या भागातील जॉर्डन नावाचा फुटबॉलपटू मुलगा  बेपत्ता आहे त्याची बातमी करा. ग्रामीण भागातील जॉर्डनचा मृत्यू हा शहरी भागात बातमीचा विषय होऊ च शकणार नव्हता. मग तान्या यांना असे कळले की, अशी एकूण सात मुले बेपत्ता होऊन मरण पावली, मग त्यातून त्यांना या पुस्तकाचा विषय सुचला. ती कथाच मला शोधत आली असे त्या सांगतात.  पुस्तकाचा विषय जरी या सात मुलांचा असला तरी त्यातून वंशविद्वेष, त्या मुलांना त्यांच्या घरापासून दूर शाळेत जावे लागणे, तेथे त्यांना मिळणारी वागणूक अशा सगळ्या गोष्टी त्यात येतात.  ती सात मुलांची कहाणी मनाचा ठाव घेणारी असल्यानेच या पुस्तकाला पुरस्कार मिळाला आहे. पुस्तक लेखन तुमच्यातून बरेच काही बाहेर आणते. त्यासाठी शारीरिक व मानसिक अशी दोन्ही प्रकारची ताकद लागते. ‘कधी कधी मी नुसती संगणकाकडे बघत बसायचे. कधी माझ्या मांजरीकडे, कधी फ्रिजकडे टक लावून बघत बसे. नंतर मधूनच काही तारा जुळल्यासारखे सुचायचे. हे पुस्तक काल्पनिक नाही तर पूर्ण शोधपत्रकारितेवर आधारित आहे. त्यामुळे तपशिलात अचूकता महत्त्वाची होती’, असे तान्या सांगतात.  या पुस्तकात कॅनडातील सरकारी यंत्रणा, पोलीस, न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, मूळ रहिवाशांचे सामाजिक प्रश्न यांचा अचूक वेध घेताना तेथील निवासी शाळांमध्ये मुलांवर उपासमारीचे केले जाणारे प्रयोग व इतर बाबींचे अंगावर  शहारे आणणारे चित्र आहे.  तान्या या टोरांटोत राहतात. त्यांना त्यांचे मूळ माहीत नसते. त्यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठही त्या सात मुलांपैकी एकाच्या चित्रकार वडिलांनी केलेले आहे. त्या भागातील नदीवर लेखिका कधीकाळी जात असे. कॅनडातील समाजातही वंशभेद आहे, मूळ रहिवाशांविरोधात अन्याय होत आहे, हे सगळे बातमीतून जेवढे मांडता आले नसते तेवढे तान्या यांनी या पुस्तकातून मांडले आहे. ते मांडत असताना त्यांना नकळत स्वत:चाही शोध लागला आहे.

Story img Loader