व्यंगचित्रकला ही समाजाचा आरसा असते, त्यात टिप्पणी तर महत्त्वाची असतेच, पण त्यातील पात्रेही तितकीच महत्त्वाची ठरत असतात. त्यातून सामाजिक व राजकीय जीवनावर परखड भाष्य अगदी योग्य पद्धतीने केले जाते. ही सर्व वैशिष्टय़े ज्यांच्या व्यंगचित्रात होती ते पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध व्यंगचित्रकार चंडी लाहिरी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी ५० वर्षे व्यंगचित्रकार म्हणून काम केले. त्यांच्या निधनाने प. बंगालमधील व्यंगचित्र इतिहासाचा एक अध्याय संपला आहे. साधेपणा व सोपेपणा ही त्यांच्या व्यंगचित्राची खास वैशिष्टय़े होती. त्यांच्या विनोदबुद्धीची धार तीक्ष्ण होती, पण त्यामुळे कधी कुणी दुखावले गेले नाही. त्यांचा जन्म नडिया जिल्ह्य़ात नबद्वीप येथे १३ मार्च १९३१ रोजी झाला. किशोरवयातच १९४२ साल उगवल्याने ते राजकीय चळवळीत सहभागी होते. पत्रकारितेत त्यांची सुरुवात १९५२ मध्ये दैनिक ‘लोकसेवक’ या बंगाली वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून झाली. पण नंतर ते १९६१ मध्ये व्यंगचित्रकलेकडे वळले. त्यानंतर ते ‘आनंदबझार पत्रिका’ समूहात काम करू लागले. तेथे व अन्यत्र त्यांनी अर्धशतकभर व्यंगचित्रे सादर केली. त्यांची राजकीय व्यंगचित्रे ही नेहमीच चर्चेचा विषय ठरत. दिवंगत मुख्यमंत्री ज्योती बसू आणि त्यानंतरचे बुद्धदेव भट्टाचार्य ही त्यांची ‘गिऱ्हाईके’; आणि या नेत्यांनाही चंडीदांचे अप्रूप!
भारताच्या राजकीय इतिहासाचे व स्वातंत्र्यलढय़ाचे सखोल ज्ञान त्यांना होते, ते त्यांच्या व्यंगचित्रातून जाणवत असे. कारकीर्दीच्या आरंभीच ट्राम अपघातात त्यांचा एक हात गेला होता तरी त्यावर मात करून ते जीवनात यशस्वी झाले. मिश्के, नेंगटी, बिदेशीदर चोखे बांगला, चंडीर चंडीपथ, बांगलार कार्टून इतिहास ही त्यांची बंगाली, तर ‘चंडी लुक्स अराउंड’ व ‘सिन्स फ्रीडम’ ही इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध आहेत. कोलकाता दूरदर्शन केंद्रासाठी सचेतपटकार (अॅनिमेटर) म्हणूनही त्यांनी मोठे काम केले. तसेच रुद्रप्रसाद सेनगुप्ता यांच्या ऑबिराटो चेनामुख या मालिकेत त्यांनी रंगीत व्यंगचित्रांचे अॅनिमेशन केले होते.
संवेदनशील मनाच्या चंडीदांनी बाल कर्करोग रुग्णालयासाठी मोफत व्यंगचित्रे काढून दिली होती. बंगाल व कोलकाता या दोन विषयांवर त्यांना व्यंगचित्र मालिका काढायची होती. त्यांनी ती तयारही करून दिली, पण ती पुस्तकरूपात येणे राहिले. जिराफ, नेंगटी (उंदीर), मिके (मांजर) या व्यंगचित्रातील प्राण्यांवर बेतलेल्या व्यक्तिरेखांतून त्यांनी मुलांना प्राण्यांप्रती संवेदनशीलता दिली. चंडीदा नेहमीच दुसऱ्यासाठी जगले. ‘हा अखेरचा आजार’ असे वाटत असताना त्यांनी, पत्नी तपती यांना रामकृष्ण मिशनच्या अनाथालयास दोन हजार रुपये देण्यास सांगितले आणि सरकारी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.