दिवसाचे चोवीस तास रंगभूमीचा अखंड ध्यास घेतलेला कलावंत आजघडीला कुणी असेल, तर ते आहेत दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी! मात्र, हे जरी खरे असले, तरी त्यांनी स्वत:ला कधी कुठल्या सीमेत बांधून घेतले नाही. चित्रपट, दूरचित्रवाणी, जाहिरात, वक्तृत्व या माध्यमांतही त्यांची समांतर मुशाफिरी सुरू असते. नुकताच त्यांना ज्येष्ठ पत्रकार अनंतराव भालेराव यांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
योगायोगाची गोष्ट म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी हेही मूळचे भालेरावांच्या औरंगाबादचेच. त्यांनीही काही काळ पत्रकारितेत व्यतीत केलेला. औरंगाबादेतच त्यांची वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घडण झाली. नाटकाची धुळाक्षरेही त्यांनी तिथेच गिरवली. ‘जिगीषा’ संस्थेत. आणि पुढे ‘जिगीषा’च्या शिलेदारांनी आपले नाणे खणखणीत आहे की नाही, हे मुंबईच्या कलाक्षेत्रात जाऊन पडताळून पाहायचे ठरवले तेव्हा काही क्षण परिस्थितीवश थोडय़ाशा द्विधा मन:स्थितीत असलेल्या कुलकर्णी यांनी त्यांचे सर्जन प्रवासातील सहकारी मित्र प्रशांत दळवी यांचा सल्ला मानला आणि ते मुंबईत आले. त्यानंतर मात्र त्यांनी फिरून मागे वळून पाहिले नाही. आपल्या अभ्यासू, शिस्तबद्ध दिग्दर्शकीय शैलीने त्यांनी रंगभूमीवरील प्रस्थापित ज्येष्ठ रंगकर्मीमध्येही आपल्या कर्तृत्वाचा धाक निर्माण करून एकाहून एक सरस नाटय़कृती साकारल्या. कुठल्याही साच्यात आपण अडकायचे नाही, हे त्यांच्या मनाशी पक्के होतेच. त्यात त्यांना मराठी रंगभूमीवरील नव्वदीच्या दशकातील नवनवोन्मेषी कालखंडानेही साथ केली. प्रशांत दळवी, अजित दळवी, अभिराम भडकमकर हे तर त्यांचे समकालीन लेखक सहप्रवासी. परंतु त्यांनी महेश एलकुंचवार, श्याम मनोहर, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, रत्नाकर मतकरी अशा आधीच्या पिढीतल्या नाटककारांची नाटकेही तेवढय़ाच आस्थेने सादर केली. मुख्य धारा रंगभूमीवर अखंड कार्यरत असतानाच समांतर रंगभूमीवर ‘यळकोट’, ‘आषाढ बार’, ‘मौनराग’सारखे वेगळे प्रयोगही ते सतत करत राहिले. ‘वाडा चिरेबंदी’ नाटय़त्रयी समांतर व मुख्य धारेत अशा दोन्हीकडे यशस्वीपणे पेश करून त्यांनी आगळा भीमपराक्रम केला. तसेच ‘हॅम्लेट’सारखे पाश्चात्य अभिजात नाटक त्याच्या भव्यतेसह सादर करण्याचे शिवधनुष्यही त्यांनी लीलया पेलले. आशय, विषय, सादरीकरण या सगळ्यात सतत प्रयोगशील राहण्याचे व्यसनच जणू त्यांना जडले आहे. ‘बिनधास्त’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट पुरुषपात्रविरहित होता. ‘गांधी विरुद्ध गांधी’ आणि ‘डॉक्टर तुम्हासुद्धा ! ’ ही दोन नाटके त्यांनी मराठीसह हिंदी व गुजराती भाषांतही दिग्दर्शित केली. दूरचित्रवाणीवरही ‘पिंपळपान’सारखी साहित्यिक कलाकृतींवरील मालिका करण्याचे वेगळेपण त्यांनी जपले. ‘टिकल ते पोलिटिकल’ या राजकीय-सामाजिक व्यंगांवर मार्मिक भाष्य करणाऱ्या मालिकेतही त्यांनी आपला असा खास ठसा उमटवला.
आपण केवळ गंभीर विषयच हाताळू शकतो असे नाही, तर विनोदी, विडंबनात्मक कलाकृतीही तितक्याच कौशल्याने सादर करू शकतो, हे त्यांनी त्यातून सिद्ध केले. तीव्र सामाजिक-राजकीय भान आणि समाजाप्रती बांधिलकी यांचे संस्कार घेऊन मुंबईच्या मायावी कलानगरीत आलेल्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी या तत्त्वांपासून कधीच फारकत घेतली नाही. भालेराव स्मृती पुरस्कार हा त्यांच्या लेखी घरच्यांनी पाठीवर मारलेली एक कौतुकाची थाप असेल. त्याचबरोबर वाढलेली आणखी एक जबाबदारीसुद्धा!