ऑलिम्पिक खेळांप्रमाणेच ज्या आणखी एका खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी चीनने राष्ट्रव्यापी कार्यक्रम हाती घेतला, तो खेळ म्हणजे बुद्धिबळ. बुद्धिबळाचा जन्म भारतातला. या खेळाप्रमाणेच चीनमध्येही ‘पटयुद्ध’ प्रकारात मोडता येतील असे काही खेळ काही शतकांपासून अस्तित्वात आहेत. परंतु या खेळांचा बुद्धिबळाइतका विस्तार झाला नाही. चीनच्या या खेळातील थक्क करणाऱ्या प्रगतीचे पहिले खणखणीत उदाहरण म्हणजे माजी महिला जगज्जेती हू यिफान, जी आता केवळ खुल्या गटात खेळते. चीनचा आणखी एक बुद्धिबळपटू अल्पावधीत जगज्जेता बनू शकतो. त्याचे नाव डिंग लिरेन. जागतिक क्रमवारीत विद्यमान जगज्जेता मॅग्नस कार्लसन आणि अमेरिकेचा फॅबियानो करुआना यांच्या पाठोपाठ लिरेन तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, कार्लसनप्रमाणेच पारंपरिक (क्लासिकल), जलद (रॅपिड) आणि अतिजलद (ब्लिट्झ) या तिन्ही प्रकारांमध्ये २८०० किंवा त्यावर एलो मानांकन असलेला डिंग लिरेन केवळ दुसरा बुद्धिबळपटू. नुकतेच त्याने लंडनमधील ग्रँड चेस टूर स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेत कार्लसनही होता. अंतिम लढतीत लिरेनने फ्रान्सच्या माक्सिम वाशिये-लाग्रेवला हरवले. या अजिंक्यपदामुळे आधुनिक बुद्धिबळ पटावर लिरेनचे महत्त्व अधोरेखित झाले. काही महिन्यांपूर्वी त्याने अमेरिकेत कार्लसनला टायब्रेकरमध्ये हरवून सिंकेफील्ड स्पर्धा जिंकली होती. कोलकात्यात नुकत्याच झालेल्या टाटा स्टील स्पर्धेत लिरेनने ब्लिट्झ प्रकारामध्ये कार्लसनला दोन वेळा हरवले होते. ती स्पर्धा लिरेनला जिंकता आली नाही, तरी कार्लसनसारख्या जगज्जेत्याला वरचेवर हरवणारा बुद्धिबळपटू अशी त्याची प्रतिमा बनू लागली आहे. पुढील वर्षी कार्लसनचा आव्हानवीर ठरवणाऱ्या कँडिडेट स्पर्धेत डिंग लिरेनकडून बऱ्यापैकी अपेक्षा बाळगल्या जात आहेत. बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत (जगज्जेतेपदाची लढत नव्हे) दोन वेळा (२०१७, २०१९) अंतिम फेरी गाठणारा तो एकमेव बुद्धिबळपटू आहे. ऑगस्ट २०१७ ते नोव्हेंबर २०१८ या काळात लिरेन सलग १०० डावांमध्ये अपराजित राहिला, जो त्या वेळी एक विक्रम होता. हा विक्रम अलीकडेच कार्लसनने मोडला. कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता खेळणे, पटावरील विविध स्थितींची नेमकी जाण ही लिरेनच्या खेळाची काही वैशिष्टय़े सांगता येतील. एकदा एका स्पर्धेदरम्यान विश्रांतीच्या दिवशी सायकलवरून पडल्यामुळे लिरेनच्या कंबरेला दुखापत झाली होती. ती बरी होण्यासाठी बराच अवधी गेला. पण त्याही स्थितीत लिरेन खेळला आणि त्याने चमकदार कामगिरी केली. कार्लसनला हरवून जगज्जेता बनण्यासाठी तशाच जिद्दीची आणि चिकाटीची गरज आहे. हे दोन्ही गुण डिंग लिरेनकडे असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.
डिंग लिरेन
कार्लसनला हरवून जगज्जेता बनण्यासाठी तशाच जिद्दीची आणि चिकाटीची गरज आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 12-12-2019 at 02:12 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chess player ding liren profile zws