नागपूरच्या दिव्या देशमुखने बुद्धिबळामध्ये उत्तुंग भरारी घेत आपल्या परिवारासह विदर्भाच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोवला. विशेष म्हणजे, देशमुख परिवारात कुणाचाही खेळाशी थेट संबंध नाही. दिव्याचे वडील डॉ. जितेंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत, तर आई नम्रता खासगी क्लिनिक चालवतात. मात्र ‘स्मार्टफोनच्या जमान्यात आपल्या मुलींनी मदानात जावं,’ अशी त्या दोघांचीही मनापासून इच्छा होती. त्यामुळे त्यांनी थोरल्या मुलीला बॅडिमटन शिकायला पाठवलं आणि दिव्याला बुद्धिबळात. मुलींनी खेळामध्ये करिअर करावं हा त्यामागचा मुळीच हेतू नव्हता. मात्र फिटनेस म्हणूनच त्यांनी खेळाला महत्त्व दिलं, परंतु ६४ घरांच्या पटलावर दिव्या अधिराज्य गाजवेल याचा चुकूनही विचार देशमुख परिवाराने केला नव्हता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरुवातीला स्थानिक स्पर्धामध्ये भाग घेऊन दिव्याने स्पर्धा जिंकण्यास सुरुवात केली आणि हळूहळू दिव्याची प्रतिभा समोर येऊ लागली. दिव्या एकापाठोपाठ यशाची शिखरे गाठू लागली. बुद्धिबळातील तज्ज्ञांनीही दिव्याची स्तुती केली. अशात दिव्याच्या पालकांनी तिला बुद्धिबळावर लक्ष केंद्रित करू दिले. प्रशिक्षक राहुल जोशींच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या दिव्याने आयुष्यातील पहिली चॅम्पियनशिप २०१० मध्ये जिंकली. औरंगाबादमध्ये झालेल्या राज्य बुद्धिबळ स्पर्धेत सात वर्षांखालील गटात बाजी मारल्यानंतर दिव्याने कधीच मागे वळून बघितले नाही. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धात दिव्याने खेळातले नैपुण्य दाखवले. अल्पावधीतच ती बुद्धिबळातील राजकुमारी ठरली. २०१२ मध्ये सात वर्षांखालील मुलींच्या गटात दिव्याने पहिली राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. त्यानंतर इराणमधील आशियाई युवा चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्या खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. या स्पर्धेत तिने दोन सुवर्णपदकासोबतच बुद्धिबळातीळ प्रतिष्ठेचा महिला फिडे किताबही आपल्या नावे केला. कमी वयात हा बहुमान मिळवणारी दिव्या भारतातील पहिली वंडरगर्ल ठरली. हल्दीदिकी (ग्रीस), ताश्कंद (उझबेकिस्तान), दरबन (द. आफ्रिका), दिल्ली कॉमनवेल्थ गेम्ससारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये दिव्याने वैदर्भीय झेंडा फडकता ठेवला.

तेरावर्षीय दिव्या ग्रॅण्डमास्टर या बुद्धिबळातील अत्यंत महत्त्वाच्या नॉर्मपासून काहीच अंतर दूर आहे. मात्र दिव्याने तिच्या कामगिरीने देशातील सर्वोत्तम महिला बुद्धिबळपटूंमध्ये स्थान मिळवले आहे. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने नुकत्याच जारी केलेल्या देशातील महिला बुद्धिबळपटूंच्या मानांकनात दिव्याने दिग्गज बुद्धिबळपटूंना मागे टाकत तिसऱ्या स्थानावर (तिच्या पुढे फक्त कोनेरु हम्पी आणि हरिका द्रोणवल्ली) झेप घेतली आहे. दिव्याने २४३२ इलो रेटिंगसह ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, दोन वेळची वर्ल्ड कॅडेट चेस चॅम्पियन असलेल्या दिव्याने गेल्या वर्षी मुंबईत वुमन चेस मास्टरचा नॉर्म पूर्ण केला. दिव्याला यंदाच्या वर्षी राज्य शासनाकडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. दिव्याने खेळासोबतच शिक्षणालाही तेवढेच महत्त्व दिले असल्याचे तिचे पालक सांगतात. दिव्या सध्या चेन्नईस्थित ग्रॅण्डमास्टर आर. बी. रमेश यांच्याकडून व्यक्तिश: व ऑनलाइन मार्गदर्शन घेत आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chess player divya deshmukh profile