बुद्धिबळ हा मूळ भारतीय खेळ, पण जवळपास आठ-नऊ दशके या खेळावर वर्चस्व गाजवले ते सोव्हिएत बुद्धिबळपटूंनी. शालेय स्तरावरच बुद्धिबळपटू विकसित व्हावे म्हणून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण पद्धती रुजवण्यात पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत महासंघाच्या विशेषत कम्युनिस्ट राजवटींचे योगदान अनन्यसाधारण आहे. अलेक्झांडर अलेखाइन, मिखाइल बॉटविनिक, मिखाइल ताल, वासिली स्माइस्लॉव्ह, टायग्रिन पेट्रोश्यान, बोरिस स्पास्की, अनातोली कारपॉव, गॅरी कास्पारॉव्ह; तसेच नवीन सहस्रकात व्लादिमीर क्रॅमनिक, अलेक्झांडर खलिफमन, रुस्तम कासिमझानॉव्ह, रुसलान पोनोमारियॉव असे बुद्धिबळ जगज्जेते सोव्हिएत महासंघ किंवा नंतर शकले झालेल्या त्याच्या घटकदेशांतून निर्माण झाले. याशिवाय कित्येक गुणवान बुद्धिबळपटू जगज्जेते बनले नाहीत, तरी सोव्हिएत दबदबा जिवंत ठेवण्यात आणि बुद्धिबळातील सैद्धान्तिक प्रगतीत त्यांचे योगदान मोलाचे राहिले. एव्हगेनी स्वेश्निकॉव्ह अशांपैकीच एक. ‘सोव्हिएत स्कूल’ वा सोव्हिएत घराण्यातील हे निष्णात बुद्धिबळपटू. याशिवाय, ज्यांच्या नावे बुद्धिबळाची आरंभ व्यूहरचना (ओपनिंग) ओळखली जाते, अशा मोजक्या भाग्यवंतांपैकी हे एक. एव्हगेनी यांना वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून चेकर्स या खेळातील तंत्र आकळू लागले. वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांकडून बुद्धिबळ शिकले, त्यांना हरवूही लागले! लवकरच एका स्थानिक क्लबमध्ये ते जाऊ लागले आणि तेथेही आपल्यापेक्षा वयाने मोठय़ा बुद्धिबळपटूंना सहज हरवू लागले. त्या काळच्या अनेक बुद्धिबळपटूंप्रमाणेही तेही अभियांत्रिकीकडे वळले. पदवीनंतर सक्तीच्या लष्करी सवेकडे वळणे क्रमप्राप्त होते, परंतु एव्हगेनी यांच्यातील बुद्धिबळप्रज्ञा पाहून सोव्हिएत सरकारने त्यांना या खेळावरच लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. त्यांनी अनेक स्पर्धामध्ये भाग घेताना नोकरीही सांभाळली. १९६०च्या दशकात काळ्या मोहऱ्यांनी सिसिलियन प्रकारात खेळताना त्यांनी काही विशिष्ट व्यूहरचना अवलंबली. ती त्यांनी शोधली असे नव्हे. पण पुढे कित्येक वर्षे ती रचना एव्हगेनी बिनदिक्कत खेळत राहिले, त्यामुळे त्यांचेच नाव (सिसिलियन डिफेन्स – स्वेश्निकॉव्ह व्हेरिएशन) तिला देण्यात आले! आज जगज्जेता मॅग्नस कार्लसन, माजी जगज्जेता क्रॅमनिक, विद्यमान आव्हानवीर इयन नेपोम्नेयाची, माजी जागतिक उपविजेता बोरिस गेलफँड ही रचना सर्रास अवलंबितात. व्यूहरचनांचे स्वामित्वहक्क बुद्धिबळपटूंना मिळायला हवेत असा त्यांचा आग्रह असे. एव्हगेनी हे जगज्जेते बनू शकले नाहीत, पण बुद्धिबळातील रंजकता वाढवण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न स्मरणीय ठरले. नुकतेच वयाच्या ७१व्या वर्षी एव्हगेनी यांचे निधन झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा