सातारचे प्रल्हाद गजेंद्रगडकर व पुण्याचे यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर भारताचे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळणार असलेले न्या. शरद बोबडे मूळचे नागपूरचे. न्यायपालिकेच्या वर्तुळात ते मृदू स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. इंग्रजी, मराठी व संस्कृत या तीनही भाषांवर प्रभुत्व असलेल्या बोबडेंना जगभरातील अनेक भाषा व लिपी समजून घेण्यात व शिकण्यात विलक्षण रस आहे. आठ खंडांत असलेला धर्मशास्त्रांचा इतिहास, भगवद्गीता, ऋग्वेद यांसारखे धर्म व न्यायाशी संबंधित अनेक ग्रंथ त्यांनी वाचून स्मरणात ठेवले आहेत. न्यायमूर्ती म्हणून वेगवेगळ्या शहरांत राहूनही, ‘नागपूरकर’ ही ओळख त्यांनी आजवर काळजीपूर्वक जपली आहे. विदर्भाविषयी विलक्षण ओढ असलेल्या बोबडेंना या प्रदेशाच्या विस्मृतीत जात असलेल्या इतिहासाविषयी काळजी वाटते व तो जतन करायला हवा, असे ते अनेकदा बोलून दाखवतात. सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा त्यांचा कटाक्ष पूर्वीपासूनचा. शेतकरी नेते शरद जोशी बोबडेंचे जवळचे मित्र. बँकेचे कर्ज न फेडू शकणाऱ्या शेतकऱ्यांना नादारीचे अर्ज भरायला लावण्याची कल्पना या दोघांच्या चर्चेतून पुढे आली. जोशींच्या आवाहनानंतर चार लाख शेतकऱ्यांनी असे अर्ज भरले. त्यांचा हा लढा न्यायालयात टिकावा म्हणून बोबडे अखेपर्यंत संघर्षरत राहिले. लाखो शेतकऱ्यांच्या वतीने लढणारे बोबडे हे देशातील कदाचित एकमेव वकील असावेत. याच नादारी आंदोलनातून पुढे कर्जमुक्तीची चळवळ सुरू झाली. एकदा वकील म्हणून न्यास कायद्याशी संबंधित एक प्रकरण हाताळताना त्यांनी ‘इच्छुक व्यक्ती’ व ‘अशी व्यक्ती ज्याची इच्छा आहे’ यातील फरकावर केलेला दीड तासाचा युक्तिवाद अनेक वकिलांच्या आजही स्मरणात आहे. छगन भुजबळांनी शिवसेना फोडली तेव्हा नागपुरात अधिवेशन सुरू होते. हे पक्षांतर बेकायदा कसे ठरवता येईल, यासाठी सेनेच्या वतीने बोबडेंनी न्यायालयात खिंड लढवली होती. बाळासाहेब ठाकरेंविरुद्ध नागपूर खंडपीठात अवमान-खटला दाखल झाला, तेव्हा त्यांची बाजू समर्थपणे मांडणारे बोबडेच होते. संगीत ऐकणे, त्याच्या मैफिलींना जाणे, असा छंद जोपासणाऱ्या बोबडेंना धर्म आणि न्यायशास्त्राच्या बौद्धिक वादविवादातसुद्धा नेहमी रस राहिला आहे. श्रीकांत जिचकार यांच्याशी त्यांच्या होणाऱ्या चर्चा आजही अनेकांना आठवतात. ट्रेकिंग हा त्यांचा आणखी एक छंद. नागपूरच्या शेजारी असलेल्या पचमढी परिसरातील अनेक दुर्लक्षित गुंफा त्यांनी या छंदातून शोधून काढल्या. आजोबा, वडील असा वकिलीचा खानदानी वारसा लाभलेल्या बोबडेंचे नागपुरातील घर कायदेविषयक पुस्तकांचे संग्रहालय म्हणून विधि वर्तुळात ओळखले जाते. सर्वासाठी खुले असलेले हे ‘बोबडे कम्पाऊंड’मधील ग्रंथालय या नियुक्तीने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा