वैज्ञानिक, सामाजिक विषयांवर चतुरस्र लेखन करणाऱ्या चित्रा बेडेकर यांची निधनवार्ता बुधवारी आली आणि या उत्फुल्ल लेखिकेचे अचानक सोडून जाणे हे अनेकांना चटका लावणारे ठरले. चित्रा यांचा जन्म ७ ऑगस्ट १९४६ चा. भौतिकशास्त्रात एमएस्सी केल्यानंतर त्यांनी काही काळ मुंबईत अध्यापन व नंतर पुणे येथील एआरडीईच्या (केंद्रीय संरक्षण खात्याच्या) संशोधन संस्थेत वैज्ञानिक अधिकारी म्हणून काम केले. एआरडीईमधील अल्पकाळच्या कारकीर्दीत त्यांना शस्त्रास्त्रनिर्मिती प्रकल्पांत काम करता आले. गेल्या सुमारे चार दशकांपासून त्या विविध सामाजिक चळवळींशी जोडलेल्या होत्या. लोकविज्ञान चळवळ ही त्यापैकी एक. ‘ऑल इंडिया पीस अॅण्ड सॉलिडॅरिटी ऑर्गनायझेशन’चे कामही त्यांनी केले. याच काळात वैज्ञानिक, सामाजिक व राजकीय विषयांवर विविध पुस्तके, तसेच नियतकालिके आणि दैनिकांमधून विपुल लेखनही त्यांनी केले. अणुविज्ञान आणि त्या अनुषंगाने येणारे मुद्दे, पर्यावरण, शांतता चळवळ, नवी आर्थिक धोरणे, शीतयुद्ध, आरोग्य, शाश्वत विकास अशा अनेक विषयांवर त्यांनी लिहिले आहे. अभ्यासपूर्ण, तरीही सोप्या शैलीतील त्यांचे हे लिखाण सर्वच स्तरांतील वाचकांना आवडे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा