भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गुरुदास दासगुप्ता यांच्या निधनाने पश्चिम बंगालमधील अभ्यासू व तळमळीने विषय मांडणाऱ्या संसदपटूंची पिढी अस्तंगत झाली. याआधी सोमनाथ चॅटर्जी, इंद्रजीत गुप्त, हरकिशनसिंह सुरजित आदी डाव्या पक्षांच्या आक्रमक नेत्यांची फळीच संसदेत होती. याच काळात सत्ताधारी बाकांवर माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यासारखे तेवढेच अभ्यासू नेते होते.  राज्यसभा किंवा लोकसभेत एखाद्या विषयावर तिरकसपणे, काहीसे टोचून बोलण्याचा दासगुप्ता यांचा हातखंडा! राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातील ‘बोफोर्स’ किंवा डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील २-जी घोटाळ्याचे आरोप करताना, दासगुप्ता यांनी सरकारचे वाभाडे काढले होते. २-जी घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या संसदेच्या संयुक्त समितीचे दासगुप्ता यांनी सदस्यत्व भूषविले होते. समितीने घोटाळा नसल्याचा अहवाल तयार केला असता या विरोधात त्यांनी टिप्पणी सादर केली होती. २-जी घोटाळ्यावरून लोकसभेत चर्चारोध झाला असता, ‘पंतप्रधान काय लहान मूल आहेत का, की त्यांना समजत नाही?’ अशी बोचरी टीका केली होती. दासगुप्ता बोलायला उभे राहिल्यावर समोरील मंत्रीही सावध होत. कारण दासगुप्ता खोचकपणे बोलून कशी टोपी उडवतील याची मंत्र्यांना भीती असे. शर्टाचे वरील बटण उघडे ठेवून आणि हाताच्या बाह्य गुंडाळून बोलण्याची त्यांची लकब सर्वज्ञात होती. २०१२ मध्ये लोकसभेत तत्कालीन वित्तमंत्री प्रणब मुखर्जी यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची दासगुप्ता यांनी अशाच पद्धतीने खिल्ली उडविली होती. ‘अर्थसंकल्प तयार करण्यासाठी मुखर्जी यांची काहीही गरज नाही. वित्त खात्यातील कारकूनही हा अर्थसंकल्प तयार करेल,’ अशी खोचक टिप्पणी त्यांनी तेव्हा केली होती. संसदेप्रमाणेच कामगार क्षेत्रातही त्यांनी छाप पाडली. ‘आयटक’ या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कामगार संघटनेचे सरचिटणीसपदही त्यांनी भूषविले होते. कामगार चळवळ जोरात असताना आयटक आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित ‘सिटू’ कामगार संघटनांमध्ये शीतयुद्ध सुरू असायचे. तेव्हा सिटूला मागे टाकीत आयटकची सदस्यसंख्या जास्त करण्यावर दासगुप्ता यांनी भर दिला होता. तीन वेळा राज्यसभा तर दोनदा लोकसभेचे सदस्य काम करणाऱ्या दासगुप्तांचा आवाका बघून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी त्यांचा उल्लेख ‘‘गुरू’ दासगुप्ता’ असा करीत! राजकारणाबरोबरच ते क्रिकेट आणि संगीताचेही शौकीन होते. कोलकाता क्रिकेट क्लबचे ते पदाधिकारी होते. जीवनावर प्रेम करणारा साम्यवादी चेहरा त्यांच्या निधनाने लोपला आहे!

Story img Loader