स्त्रीवादाचे जागतिक भान जसे १९७० च्या दशकात आले, तसे पर्यावरणवादाचे भान देशांच्या सीमा ओलांडून १९८० च्या दशकात येऊ लागले. नेहरूकाळात ‘मंदिरे’ मानली जाणाऱ्या मोठय़ा धरणांबाबत ‘विकास की विनाश?’ हा प्रश्न याच १९८० च्या दशकात उद्भवला. हे दशक मुंबईची ‘गिरणगाव’ ही ओळख पुसू पाहणारे ठरले. आणि याच दशकापासून, डॅरिल डिमॉन्टे यांच्या लेखणीची धार दिसू लागली. आधी ‘इंडियन एक्स्प्रेस’चे मुंबईतील निवासी संपादक म्हणून, तर पुढे ‘टाइम्स ऑफ इंडिया’त त्याच पदावर काम पाहात असताना, लिहितेपणापासून हळूहळू कार्यकर्तेपणाकडे त्यांचा प्रवास झाला आणि त्यांनी दैनंदिन पत्रकारिता सोडली. ‘टेम्पल्स ऑर टूम्ब्ज : इंडस्ट्री व्हर्सस एन्व्हायर्न्मेंट’ (प्रथमावृत्ती १९८५) हे त्यांचे पुस्तक, औद्योगिकीकरणाचे भोळसट गोडवे गाणाऱ्या इंग्रजी वाचकांत त्या वेळी उपरे ठरले, पण अभ्यासकांनी त्याचे स्वागत केले. मुंबईतून कापडगिरण्या हद्दपार होत असतानाचे स्थित्यंतर डॅरिल यांनी जवळून पाहिले होते. या गिरण्या टिकल्या पाहिजेत, मुंबईकर कामगार- मराठी माणूसही- टिकला पाहिजे, ही त्यांची कळकळ त्यांच्या तत्कालीन लिखाणातून दिसे. पुढे ‘रिपिंग द फॅब्रिक : द डिक्लाइन ऑफ मुंबई अॅण्ड इट्स मिल्स’ या पुस्तकातून ती अभ्यासूपणे ग्रथित झाली. सामान्य माणसे आणि त्यांचे पर्यावरण, हा डॅरिल यांचा खरा विषय! त्यामुळेच त्यांचे काम केवळ हवेची गुणवत्ता किंवा जंगलांचा ऱ्हास एवढय़ापुरते मर्यादित नव्हते. बाबरी मशीद उद्ध्वस्तीकरणानंतरच्या वातावरणात, वांद्रे पूर्वेकडला बदनाम बेहरामपाडा शांत राहावा यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आणि पत्रकार या नात्याने, ‘दंगलींचे वार्ताकन यापुढे ‘समाजां’ची ओळख लपवून नको. कळू दे कुणामुळे कुणाचे नुकसान झाले’ असा अनेकांना न रुचणारा निर्णयही त्यांनी घेतला, तो याच मनुष्यप्रेमामुळे. किंबहुना पर्यावरण-अभ्यासही त्यांनी सुरू ठेवला होता तोच माणसांच्या भवितव्याची काळजी असल्यामुळे. ‘फोरम ऑफ एन्व्हायर्न्मेटल जर्नालिस्ट्स ऑफ इंडिया’चे अध्यक्ष व ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एन्व्हायर्न्मेटल जर्नालिस्ट्स’चे संस्थापक-अध्यक्ष (१९९३) अशी ओळख असलेल्या डॅरिल यांची कर्करोगाशी झुंज यशस्वी होत होती. ‘बरा झालो’ म्हणून समाजजीवनात सहभागी होत असतानाच, परवाच्या शनिवारी, पंचाहत्तरीतच ते निवर्तले.
डॅरिल डिमॉन्टे
गिरण्या टिकल्या पाहिजेत, मुंबईकर कामगार- मराठी माणूसही- टिकला पाहिजे, ही त्यांची कळकळ त्यांच्या तत्कालीन लिखाणातून दिसे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 19-03-2019 at 00:24 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daryl demonte profile