यंदाचा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार निसर्गवादी कार्यकर्ते आणि निसर्ग माहितीपटकार, संवादक सर डेव्हिड अॅटनबरो यांना जाहीर झाला आहे. बीबीसीसाठी गेली अनेक दशके निसर्ग, पर्यावरण, परिस्थितिकी, पशुपक्षी या विषयांवर अभ्यासपूर्ण माहितीपट आणि माहितीमालिका बनवून डेव्हिड अॅटनबरो भारतातही घराघरांमध्ये पोहोचले आहेत. काहीशा घोगऱ्या आवाजात, नर्मविनोदी शैलीतील विवेचन, अनेकदा पशूंच्या आसपास वावरत केलेले सादरीकरण ही त्यांची वैशिष्टय़े. पशूंसमवेत सादरीकरणाच्या त्यांच्या शैलीचा कित्ता पुढल्या पिढय़ांतील माहितीपटकार आजही गिरवतात. अॅटनबरो यांचे वडील फ्रेडरिक हे लीस्टर युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये मुख्याध्यापक होते. याच महाविद्यालय परिसरात अॅटनबरो यांचा जन्म झाला. थोरले बंधू रिचर्ड यांनी चित्रपट अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती क्षेत्रात नाव काढले. हेच ते ‘गांधी’कार सर रिचर्ड अॅटनबरो. धाकटे बंधू जॉन एका इटालियन मोटार कंपनीत वरिष्ठ हुद्दय़ावर होते. तिन्ही अॅटनबरो भावंडांना हव्या त्या क्षेत्रामध्ये मुशाफिरी करण्याची मुभा घरातूनच मिळाली होती. लहानगे असताना डेव्हिड अॅटनबरो यांना दगड, जीवाश्म, छोटे प्राणी गोळा करण्याचा छंद जडला. अवघ्या सातव्या वर्षी त्यांनी जमवलेल्या साठय़ाला ‘उत्तम संग्रहालय’ अशी पावती जॅकेटा हॉक्स या पुरातत्त्व शास्त्रज्ञाने दिली होती. लीस्टर महाविद्यालयाला न्यूट या उभयचर प्राण्यांची काही प्रयोगांसाठी गरज आहे असे समजताच अॅटनबरो यांनी जवळच्याच तलावातून अनेक न्यूट पकडून दिले. १९३६ मध्ये वनसंवर्धनासंदर्भात एक व्याख्यान ऐकल्यानंतर या विषयाची गोडी त्यांना लागली. पुढे भूगर्भशास्त्र आणि प्राणिशास्त्र या विषयांमध्ये पदवी घेतल्यावर सुरुवातीला बीबीसी रेडिओवर नोकरीसाठी त्यांनी प्रयत्न केले. रेडिओऐवजी बीबीसी टीव्ही कंपनीत त्यांना संधी मिळाली. बीबीसी हे केवळ चांगले आणि बहुतांश निष्पक्ष वृत्तमाध्यम न राहता, त्याच तोलामोलाचे माहितीमाध्यम बनले ते अॅटनबरो यांच्यासारख्या काही चोखंदळ निर्मात्यांमुळे. टांझानियातील हत्ती असोत वा न्यू गिनीतील आदिम जमाती, प्लास्टिकचा विळखा असो की तापमानवाढीची समस्या, अॅटनबरो यांनी अशा अनेक विषयांचे विविध प्रदेशांमध्ये जाऊन चित्रीकरण केले आणि अत्यंत अभ्यासपूर्ण माहितीपटांची निर्मिती केली. मुद्देसूद आणि अभिनिवेशरहित मांडणी ही बीबीसीची खासियत अॅटनबरोंमध्ये पुरेपूर उतरली होती. ‘लिव्हिंग प्लॅनेट’, ‘लाइफ’ या मालिका आजच्या यू-टय़ूबच्या जमान्यातही प्रचंड लोकप्रिय आहेत, हे वास्तव अॅटनबरोंच्या निर्मितीकौशल्याची आणि निसर्गसंवर्धन जाणिवांची कालातीतता सिद्ध करते. आज या टप्प्यावरही ग्रेटा थुनबर्गसारख्या युवा, आधुनिक संवर्धन-समरांगिणीच्या कार्यात ते रस घेतात आणि तिला दाद देतात. अॅटनबरो यांचा हा मोकळेपणाही अनुकरणीयच.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2019 रोजी प्रकाशित
डेव्हिड अॅटनबरो
लहानगे असताना डेव्हिड अॅटनबरो यांना दगड, जीवाश्म, छोटे प्राणी गोळा करण्याचा छंद जडला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 22-11-2019 at 03:08 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: David attenborough to get indira gandhi peace prize for 2019 zws