‘माझी चित्रेच बोलतील’ असे चित्रकाराने म्हणण्यामागे चित्रकाराचा अहंकार असो की खरोखरचा मुखदुर्बळपणा..चित्राबद्दल काहीही न बोलणारे चित्रकार मागे राहतात आणि बोलणारे पुढे जातात. जर चित्रे काहीएक अभिव्यक्ती करीत असतील, ही अभिव्यक्ती ताजी/ स्वतंत्र असेल, तर अशा चित्रांबद्दल बोलणे हे समीक्षक आणि कलेच्या इतिहासकाराचे काम असते. पण कलेच्या बाजारात समीक्षकांचाही आवाज दबलेलाच.. अशा वेळी काय करावे? -या प्रश्नाचे खणखणीत उत्तर म्हणजे, डेव्हिड ड्रिस्केल यांचे जीवनकार्य! ‘आफ्रो-अमेरिकन आर्ट’ किंवा कृष्णवर्णीय अमेरिकी कलावंतांच्या कलेबद्दल व्यापक चर्चा घडवून आणण्यासाठी कारकीर्द वेचणाऱ्या डेव्हिड यांचे अलीकडेच (१ एप्रिल) निधन झाले.
ते मूळचे चित्रकारच. उत्फुल्ल आणि उठावदार रंगांना प्राधान्य देणारी, प्रसंगी रंगसंगतीचे पथ्य न पाळता भरपूर रंगछटांचा वापर करणारी अशी चित्रे त्यांनी केली. १९३१ साली जन्मलेल्या डेव्हिड यांनी वयाच्या तिशीपर्यंत, चित्रकला शिक्षण टप्प्याटप्प्याने पूर्ण करतानाच कला शिक्षक म्हणून नोकऱ्या केल्या, काही चित्रकारांचे सहायक म्हणून कामही केले. मात्र १९६२ साली कलेतील पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर, नेदरलँड्सच्या द हेग अॅकॅडमीतून त्यांनी कलेतिहासाचे शिक्षण घेतले. तेथून परतल्यानंतर विद्यापीठांत कलाध्यापन करतानाच, १९७६ मध्ये ‘आफ्रिकी-अमेरिकी कलेची २०० वर्षे’ या नावाचे प्रदर्शन त्यांनी भरवले! तोवर या कलेबाबत सारेच गप्प होते, तिची दखल या प्रदर्शनाने घ्यायला लावली. हे साधले, त्यामागे डेव्हिड यांनी प्रत्येक कलाकृतीबाबत अभ्यासपूर्वक केलेले लिखाण आणि कलाप्रवाह म्हणून घेतलेला एकसंध आढावा यांचा वाटा होताच; पण ही सारी चित्रे जमविण्यासाठी अनेक खासगी कलासंग्रह धुंडाळण्यात डेव्हिड यांनी कमीपणा मानला नाही, हेही महत्त्वाचे होते. पुढे अनेक कलासंग्राहकांचे ‘सल्लागार’ म्हणूनही त्यांनी (मेरीलँड विद्यापीठातील पद सांभाळून) काम केले आणि यापैकी काही संग्रह त्या संग्राहकांच्या निधनानंतर, विद्यापीठाच्या संग्रहाला देणगी म्हणून मिळाले!
खासगी चित्रसंग्राहक, कलाबाजार यांचा दुस्वास न करता त्यासोबत काम केल्यामुळे, डेव्हिड हे प्रत्यक्ष प्रभाव पाडू शकले. ‘आफ्रिकन अमेरिकन आर्ट’ हा आफ्रिकी कलेपेक्षा निराळा आणि आधुनिक अमेरिकी कलाप्रवाह आहे, हा त्यांचा मुद्दा जगाने मान्य केला. आपल्याकडे ‘दलित आर्ट’संदर्भात हा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न अनेक जण करीत आहेत. पण संग्राहकांची साथ त्यांना पुरेशी नाही. १९६० ते २०१० या काळात, डेव्हिड यांना ही साथ उत्तमरीत्या मिळाली.