अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फारच थोडय़ा नियुक्त्या वा नेमणुका गुणाधारित आणि वादातीत ठरतात. पण या नियमाला खणखणीत अपवाद ठरू शकेल, अशी व्यक्ती ट्रम्प यांनी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी नामनिर्देशित केली आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे डेव्हिड मालपास. ते सध्या ट्रम्प सरकारमध्ये अर्थ खात्याचे उपमंत्री आहेत. जागतिक बँकेचे यापूर्वीचे अध्यक्ष जिम याँग किम (अमेरिकेत स्थायिक झालेले कोरियन) यांनी राजीनामा दिल्यामुळे ते पद रिकामे आहे. या पदावर सहसा अमेरिकी व्यक्तीची नेमणूक अमेरिकेचे अध्यक्ष करतात, असा संकेत आहे. याउलट आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अध्यक्षपद नेहमीच युरोपीय व्यक्तीकडे असते. दुसऱ्या महायुद्धाच्या अस्तानंतर लगेचच अस्तित्वात आलेल्या या वित्तीय संस्थांच्या त्या वेळच्या आणि सध्याच्या उद्दिष्टांमध्ये तफावत आहे. युद्धोत्तर पुनर्बाधणी ते जागतिक गरिबीनिर्मूलन असा हा प्रवास आहे. मालपास यांच्या नामनिर्देशनामुळे सुरुवातीला काहींच्या भुवया उंचावल्या. याचे प्रमुख कारण मालपास हे नेहमीच जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटनेसारख्या बहुराष्ट्रीय वित्तीय आणि व्यापारी संस्थांचे टीकाकार राहिले आहेत. या संस्था आणि विशेषत जागतिक बँक अजूनही अमेरिकेवर मोठय़ा प्रमाणात अवलंबून असते, शिवाय गरिबीनिर्मूलनाच्या उद्दिष्टापासून ही संस्था दूर जात असल्याचे मालपास यांचे मत होते. कर्मचाऱ्यांचे नको इतके लाड येथे होतात हा दुसरा आक्षेप. तिसरा आणि सर्वाधिक चर्चिला गेलेला आक्षेप म्हणजे, चीनचे लांगूलचालन बँकेकडून प्रमाणाबाहेर होत आहे! बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटिव्हसारख्या उपक्रमामागील राजकीय महत्त्वाकांक्षा बँकेने ओळखली पाहिजे, असे मालपास यांचे मत. तरीही त्यांच्या नावाला अमेरिकेबाहेरूनही पाठिंबा व्यक्त होत आहे. मालपास यांनी रोनाल्ड रिगन आणि जॉर्ज बुश थोरले यांच्या सरकारांमध्ये महत्त्वाची पदे सांभाळली. त्यांना फ्रेंच, स्पॅनिश आणि रशियन भाषा येतात. जागतिक बँकेविषयीचे त्यांचे बहुतेक आक्षेप आर्थिक वर्तुळात ग्राह्य़ मानले जातात. फोर्ब्स, द वॉल स्ट्रीट जर्नल यांसारख्या नियतकालिकांसाठी मालपास स्तंभलेखन करतात.
चीनविषयी त्यांनी आक्षेप घेतले असले, तरी भविष्यात कटुता नको म्हणून चीन आणि जपानच्या दौऱ्यावर जाण्याचे मालपास यांनी ठरवले आहे. त्यांच्याच प्रयत्नांमुळे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात जागतिक बँकेच्या कर्जवाटपाच्या क्षमतेत वाढ झाली. मालपास पाच वर्षांसाठी अध्यक्षपदावर राहू शकतात. या काळात त्यांचा सर्वाधिक संघर्ष कदाचित त्यांच्यासारखेच बहुराष्ट्रीय संस्थांचे टीकाकार असलेले ट्रम्प यांच्याशीच होऊ शकतो!