कॉलेजच्या दिवसांपासूनच ती ‘चेन्नई गर्ल’ म्हणून प्रसिद्ध होती. विदेशात शिकायला गेली तेव्हाही एका भारतीयऐवजी तिची हीच ओळख कायम होती. आणि तिथल्या कापरेरेट जगतात तिची हीच ओळख अजूनही आहे. दिव्या सूर्यदेवरा ही ती ३९ वर्षीय तरुणी. आता तर तिची नवी ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर झालीय. केवळ जीएमच्याच नव्हे तर अख्ख्या वाहन क्षेत्रातील ती एकमेव महिला सीएफओ ठरली आहे. हो. जनरल मोटर्सच्या या आघाडीच्या अमेरिकी वाहन उत्पादन क्षेत्रातील कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून तिची नियुक्ती झाली आहे. कंपनीच्या ११० वर्षांच्या इतिहासातील या घडामोडींबरोबरच भारतासाठीही ही बाब उल्लेखनीय ठरली आहे.

दिव्या इतर अनेकांसारखीच २२व्या वर्षांत वाणिज्य विषयात पदव्युत्तर झाली. हार्वर्ड विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापन शिकण्यासाठी ती नंतर अमेरिकेत गेली. २००२ मध्ये जागतिक बँकेत प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतर यूबीएस न् एक-दोन कंपन्यांमध्ये तिने अनुभवही घेतला. वयाच्या २५व्या वर्षी ती जनरल मोटर्समध्ये रुजू झाली. जपानी सॉफ्टबँकेतून जनरल मोटर्सचेच अन्य एक अंग असलेल्या कंपनीकरिता निधी उभारणीत तिचा सिंहाचा वाटा राहिला आहे. अनेक छोटे-मोठे नवउद्यम मुख्य जनरल मोटर्सच्या अखत्यारीत आणण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.  वाहन निर्मितीसारख्या वेगळ्या क्षेत्रात येण्याची इच्छा आधीपासून बाळगणाऱ्या दिव्याला बॉक्सिंगसारख्या खेळाचीही आवड आहे. तासन्तास कार्यालयीन कर्मचारी वगैरेंबरोबर बैठका पार पाडण्यापेक्षा दिव्याचा भर हा आपण काय चुकलो वा आपले काय राहिले याचा हिशेब मांडत आगामी दिशा ठरविण्यावर असतो. हा अ-आर्थिक हिशेबच पर्यायाने शेवटी कंपनीचा ताळेबंद अधिक भक्कम करत असतो. दिव्या गेल्या १४ वर्षांपासून जनरल मोटर्सबरोबर आहे. वाहन क्षेत्रातील सर्वात मोठय़ा वाहन माघारीचे कटू अनुभव या अमेरिकी कंपनीने घेतले आहेत. अमेरिकीच फोर्ड, मातब्बर युरोपीय नाममुद्रा आणि आशियाई बाजारपेठ गाजविणाऱ्या चिनी कंपन्या अशा वातावरणात जनरल मोटर्सला उत्तम कामगिरी करण्यासाठी दिव्याचे मार्गदर्शन भविष्यकाळात निश्चितच लाभेल.

Story img Loader