काहींना गाता गळा ही दैवी देणगी असते, तसेच आसाममधील या गायिकेचे होते. पण ज्या देवाने हा गाता गळा दिला त्यानेच तो अकाली काढून घेतला. त्यांना मेंदू विकारामुळे हे सगळे गमवावे लागले, पण जे आपल्या हातून गेले ते दुसऱ्याकडून करून घेण्यात त्यांनी दिलदारपणा दाखवला. त्यांनी एका गायकास प्रेरणा दिली. त्यांचे नाव भूपेन हजारिका. प्रेरणा देणाऱ्या त्या महान गायिकेचे नाव दीपाली बोरठाकूर. त्यांचे नुकतेच निधन झाले.

आसामच्या गानकोकिळा म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. दीपाली बोरठाकूर यांचा जन्म आसाममधील शिवसागर जिल्ह्यतला. त्यांनी गायनाच्या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर जी अफाट लोकप्रियता मिळवली तशी नंतर कुणालाही लाभली नाही. त्यांच्या जोबोन अमोनी कोरे (यूथ बॉदर्स मी) व सुनोर खारे नेलगे मुक ( आय डोन्ट वॉन्ट गोल्डन बँगल्स) या गीतांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले. पण त्यांना मोटर न्यूरॉन डिसीज हा मेंदूचा आजार जडला, त्यामुळे त्यांचा आवाज तर गेलाच, पण त्या चाकांच्या खुर्चीला खिळून राहिल्या. त्या वेळी डॉ. हजारिका यांनी ‘खितोरे खेमेका राती’ हे गीत लिहिले ती दीपाली यांना गुरुदक्षिणाच होती. बोरठाकूर यांनी त्यांच्या गीतांनी अनेकांची सकाळ— सायंकाळ प्रसन्न केली, पण त्यांच्यावरच दुर्दैवाने मुकेपणाचे खिन्न जीवन जगण्याची वेळ आली. १९५५ मध्ये सुरू झालेली दीपाली यांची कारकीर्द १९६९ मध्येच संपली. त्यांचा विवाह ललित अकादमी सदस्य नील पबन बारुआ यांच्याबरोबर झाला होता.  वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांना दिब्रुगड येथे संगीत नाटक अकादमी स्पर्धेत पुरस्कार मिळाला. गुवाहाटीची विद्यापीठात असताना त्या उत्तम गायिका म्हणून प्रकाशझोतात आल्या. प्रत्येक आसामी व्यक्तीच्या जीवनात अढळपद मिळवणाऱ्या दीपाली यांच्या २४ गाण्यांपैकी १६ गाण्यांचे ध्वनिमुद्रण एचएमव्हीने केले आहे.  त्यांच्या गाण्यातील भाव हा आसाममधील ग्रामीण व पारंपरिक जीवनशैलीचा आरसा होता. आवाज गमावल्याने त्यांच्यावर  खाणावळ चालवण्याची वेळ आली. त्याच जोडीला बारुआ हे त्यांची चित्रे विकून पैसे मिळवत होते. १९९८ मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. १९८४ मध्ये गुवाहाटी येथे हजारिका यांनी लता मंगेशकर रजनीचे आयोजन केले होते. त्यात त्यांचा सत्कार गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केला होता. त्यांच्या जाण्याने आसामच्या सांस्कृतिक जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Story img Loader