अंतराळ, वन्यजीवसारख्या अनोख्या विषयांची ज्ञानसफर ‘याचि देही, याचि डोळा’ घडविणारा डिस्कव्हरी समूह. समूहाच्या डिस्कव्हरी, अॅनिमल प्लॅनेट आदी वाहिन्या तर भारतीयांसाठी ‘वीकेण्ड’ मेजवानीच. अशा या आघाडीच्या माध्यम व मनोरंजन उद्योगाच्या भारताच्या व्यवसायाची जबाबदारी एका भारतीयाकडे देण्यात आली आहे आणि तीदेखील एका महिला पत्रकाराकडे. डिस्कव्हरीच्या दक्षिण आशियाई व्यवसायाच्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणून मेघा टाटा या नव्या वित्त वर्षांपासून धुरा हाती घेणार आहेत. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील जवळपास तीन दशकांचा अनुभव गाठीशी असलेल्या मेघा यांचा व्यवसाय व्यवस्थापन आणि कोणत्याही उद्योगासाठी महत्त्वाच्या आर्थिक नियोजनात हातखंडा आहे.
यापूर्वी बीटीव्हीआय, एचबीओ, स्टार टीव्ही, टर्नर इंटरनॅशनलसारख्या आघाडीच्या माध्यमांमध्ये त्यांनी विविध पदांची जबाबदारी हाताळली आहे. डिस्कव्हरीमधील नियुक्तीपूर्वी बीटीव्हीआयमध्ये अडीच वर्षांच्या कालावधीत कंपनीच्या भारतातील व्यवसाय विस्तारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नेटवर्क १८ समूहाच्या काही वाहिन्या वित्त वृत्त प्रसारणात अव्वल बाजारहिस्सा व सर्वाधिक दर्शकसंख्या राखून असताना बीटीव्हीआयचा जम बसविणे आणि त्याचे तग धरणे यामागे मेघा यांचे यशस्वी नेतृत्व मानायलाच हवे. अर्थसंकल्प प्रसारणदिनी ‘आम्हीच नंबर वन’ची जाहिरातबाजी करणाऱ्या काही अर्थविषयक वृत्तवाहिन्यांमध्येही पत्रकारांचे जाळे, बातम्या तसेच चर्चासत्रे याच्या जोरावर बीटीव्हीआयला स्थान देण्यामध्येही त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. मुंबईतील नरसी मोनजी वाणिज्य महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकीर्दीस ‘संडे मेल’सारख्या माध्यमातून सुरुवात केली. त्यांनी देशातील माध्यम, विपणन आणि जाहिरात क्षेत्रातील आघाडीच्या पहिल्या ५० महिला व्यावसायिकांमध्ये गणल्या जातात. आयएएसारख्या आंतरराष्ट्रीय जाहिरात संघटनेचे उपाध्यक्षपद भूषवलेल्या मेघा या सामाजिक संस्थांशीही निगडित आहेत. डिस्कव्हरी कम्युनिकेशनच्या जाळ्याखाली डिस्कव्हरी, अॅनिमल प्लॅनेट, जीत प्राइम, टीएलसीसारख्या १३ वाहिन्या आहेत. अमेरिकास्थित डिस्कव्हरी समूह मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असून भारतासह २२० देशांमध्ये तिच्यामार्फत ५० हून अधिक भाषांमध्ये कार्यक्रम प्रसारित केले जातात. मेघा टाटा यांच्या रूपातील नव्या नेतृत्वामुळे या वाहिन्यांना आता भारतीयांच्या रसिकतेला अनुसरून अधिक आकर्षक कार्यक्रम सादर करता येतील.