गेल्या चार दशकांहून अधिक काळ डायबेटिक फूट या विषयामध्ये काम करून हजारो मधुमेहींच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या डॉ. अरुण बाळ यांच्या कार्याची दखल घेऊन मेडस्टार जॉर्जटाऊन विद्यापीठाने त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. मधुमेहाच्या रुग्णाला अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो. मधुमेह केवळ रक्तातील साखर वाढवीत नाही, तर योग्य वेळी त्याची काळजी घेतली नाही तर त्याच्या विळख्यातून हृदय, डोळे, मेंदूही सुटत नाही. मधुमेहींना हमखास होणारा त्रास म्हणजे डायबेटिक फूट. पायाला जखम झाली अथवा पायाच्या रक्तवाहिन्या साकळल्या, की त्यात रक्तपुरवठय़ाचा वेग मंदावतो. काही वेळा पाय कापून टाकण्याची वेळ येते. मुळातच मधुमेहींच्या जखमा भरण्यास प्रदीर्घ कालावधी लागतो. त्यात डायबेटिक फूट ही अत्यंत गंभीर समस्या असून डॉ. बाळ यांचे या क्षेत्रातील कार्य असाधारण आहे.

एखादा अवयव काढून टाकण्याऐवजी तो वाचवणे हे कौशल्याचे काम असते. डॉ. बाळ हे गेली चार दशके मधुमेहींच्या पायाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कुशलपणे करीत आहेत. डायबेटिक फूट सोसायटी इंडियाचे अध्यक्ष असलेल्या डॉ. बाळ यांच्या कार्याची दखल घेऊन इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ डायबेटिक फूट सर्जन या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या जिनिव्हा येथे झालेल्या वार्षिक सभेमध्ये एक्झिक्युटिव्ह बोर्डावरही त्यांची निवड झाली आहे. १९७७ साली ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एम.एस. झाल्यानंतर डॉ. बाळ यांनी तेथेच सहयोगी प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. मधुमेही रुग्णांवरील उपचार त्यातही डायबेटिक फूटची समस्या असलेल्या रुग्णांवरील उपचारात ते प्रामुख्याने रमले. जे.जे. रुग्णालय व ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी अनेक डॉक्टर घडवले.   डॉक्टरांकडून रुग्णावर अन्याय झाल्यास रुग्णासाठी लढणारे डॉक्टर म्हणूनही ते ख्यातकीर्त आहेत. खासगी वैद्यकीय सेवेमध्ये कराव्या लागणाऱ्या तडजोडींना कधीही बळी न पडता वैद्यकीय मूल्ये कसोशीने जपणारे डॉ. बाळ यांनी मेडिकल कौन्सिलच्या एथिकल कमिटीमध्ये २०१० ते १३ या कालावधीत धडाडीने काम केले. ‘आकाश’ या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून रुग्णांच्या हिताची जपणूक करताना डॉक्टरांची बाजूही योग्य प्रकारे समजून घेण्याचे काम केले. १९८५ पासून रहेजा रुग्णालयात डायबेटिक फूट सर्जरी या विषयावर सातत्याने काम करीत आहेत. भारतातील मधुमेहींचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन त्यांनी २००१ पासून कोचीन येथील अमृता इन्स्टिटय़ूटमध्ये मानद डॉक्टर म्हणून काम करताना मधुमेहींच्या पायाची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी दहावी-बारावीच्या मुलांनाही प्रशिक्षण देऊन तयार केले.

Story img Loader