रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून अविरत रुग्णोपचारासाठी झटतानाच आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा खजिना वैद्यकीय क्षेत्रातील पुढील पिढय़ा घडविण्यासाठी मुक्तपणे वाटणारे डॉ. अविनाश सुपे हे एक अद्भुत रसायन म्हणावे लागेल. सध्या डॉ. सुपे हे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता व पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या डॉ. बी. सी. रॉय पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. सुपे हे गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे काम करीत आहेत. केईएममधून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर टाटा सोशल सायन्सेसमधून रुग्णालय व्यवस्थापनाची पदव्युत्तर पदवी घेतली. अमेरिकेतील शिकागो येथील इलिनॉयस विद्यापीठातून मास्टर्स इन हेल्थ प्रोफेशन एज्युकेशनची पदवी प्राप्त केली. सर्जिकल गॅस्ट्रोएंट्रॉलॉजीतील तज्ज्ञ असलेल्या डॉ. सुपे यांच्याच पुढाकारातून केईएम रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेची सुरुवात करण्यात आली. केवळ वैद्यकीय विद्यार्थ्यांचेच नव्हे तर व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांचेही ते अत्यंत आवडते शिक्षक असून त्यांची आतापर्यंत पाच पुस्तके, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये २६२ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय जगभरातील परिषदांमध्ये ३७० हून अधिक वेळा गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी विषयावर त्यांनी सादरीकरण केले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नेतृत्व निर्माण करणाऱ्या अमेरिकेतील ‘फिमर’या संस्थेतून २००२ मध्ये फेलोशिप घेतल्यानंतर त्यांची असाधारण गुणवत्ता लक्षात घेऊन ‘फिमर’ संस्थेने त्यांच्यावर आशियात वैद्यकीय क्षेत्रातील नेतृत्व घडविण्याची जबाबदारी सोपवली होती. पालिका रुग्णालये ही प्रामुख्याने गोरगरीब रुग्णांसाठी असली तरी येथे येणाऱ्या गरीब रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी ते कायम आग्रही राहिले.
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून देशातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय अभ्यासक्रम तयार करण्यातही त्यांचे मोलाचे योगदान आहे. आधी केले मग सांगितले ही वृत्ती असलेल्या डॉ. सुपे यांनी आतापर्यंत १२० वेळा स्वत: रक्तदान केले असून यासाठी केंद्र सरकारचा शतकवीर रक्तदाता हा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. डॉ. सुपे यांनी आपले निसर्ग व वन्यजीव क्षेत्रातील छंद फोटोग्राफीच्या माध्यमातून जपले असून फोटोग्राफीतील त्यांची कामगिरी लक्षात घेऊन ‘फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडिया’ने त्यांना सन्माननीय सदस्यत्वही बहाल केले आहे.