खगोलशास्त्र हा प्रचलित विज्ञान विषयांपैकी जनसामान्यांमध्ये तुलनेने जास्त लोकप्रिय असलेला प्रांत. या विज्ञानात काम करणाऱ्या भारतीय महिलांची संख्या तुलनेने थोडी आहे, त्यांपैकी एक म्हणजे डॉ. जी. सी. अनुपमा. व्यावसायिक खगोलशास्त्रज्ञांच्या अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया या नामांकित संस्थेच्या अध्यक्षपदाचा मान त्यांच्या रूपाने प्रथमच एका महिलेला मिळाला. तीन वर्षांसाठी त्यांची झालेली निवड ही इतर महिलांनाही खगोलशास्त्राच्या वाटेकडे वळण्यास प्रेरित ठरणारी अशीच आहे.
डॉ. अनुपमा या बेंगळूरु येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स या संस्थेच्या अधिष्ठाता आणि वरिष्ठ प्राध्यापक आहेत. हवाई बेटांवर अमेरिका एक अब्ज डॉलर खर्चाची जी दुर्बीण उभारत आहे, त्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय पथकात त्यांचा सहभाग आहे. ३० मीटरच्या या दुर्बिणीतील काही महत्त्वाचे भाग भारत तयार करीत असून त्या कामावर वैज्ञानिक देखरेखीचे काम अनुपमा करीत आहेत. भारतातही लडाखमधील लेह येथे दुर्बीण उभारण्याचे काम सुरू असून त्यात त्यांचा सहभाग आहे. लेहची दुर्बीण जगातील सर्वात उंचीवरची दुर्बीण ठरणार असून त्याच्या माध्यमातून वैज्ञानिकांना बरीच माहिती उपलब्ध होणार आहे. अनुपमा यांनी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स या संस्थेतून विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी घेतली असून पुण्यातील आयुका या संस्थेतून त्यांनी आणखी संशोधन केले. १९९४ पासून त्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स या संस्थेत प्राध्यापक झाल्या. इ.स. २००० मध्ये सर सी. व्ही. रामन पुरस्कार त्यांना मिळाला होता. अनेक आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांत त्यांनी शोधनिबंधही सादर केले आहेत. अतिनवतारे, गॅमा किरण स्फोटांचे स्रोत, गुरुत्वीय लहरींचे स्रोत, दीर्घिकांमधील हालचाली हे त्यांचे संशोधनाचे विषय आहेत. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डॉ. मानसी कासलीवाल यांच्या नेतृत्वाखालील ग्रोथ इंटरनॅशनल प्रकल्पात हॅनले येथे ०.७ मीटर व्यासाची यांत्रिक दुर्बीण बसवण्याच्या कामातही त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली किमान आठ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. संपादन केली आहे.
अनुपमा या अलाहाबाद येथील नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या फेलो असून अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया संस्थेने चालवलेल्या नियतकालिकाच्या संपादक आहेत. अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे एकंदर एक हजार सदस्य आहेत. देशात खगोलशास्त्र व त्याच्या शाखांचा प्रसार करण्याचे काम ही संस्था करते. त्यासाठी बैठका आयोजित करून खगोलशास्त्र लोकप्रिय करून विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबत कुतूहल निर्माण करणे हे काम ही संस्था अव्याहतपणे करीत आहे.