विज्ञानाच्या संशोधनाच्या क्षेत्रात अजूनही स्त्रियांना पुरेशा संधी मिळतात अशातला भाग नाही. लंडनमधील रॉयल सोसायटी या विज्ञान क्षेत्रातील नामवंत संस्थेची स्थापना १६६० मध्ये झाल्यानंतर १९४५ पर्यंत एकाही महिलेला या संस्थेच्या फेलोपदाचा मान मिळाला नव्हता. त्यानंतरच्या काळात १३३ महिलांना तो मिळाला, पण तरी त्यात अद्याप एकाही भारतीय महिलेचा समावेश नव्हता. तो मान वैद्यक क्षेत्रातील संशोधक असलेल्या डॉ. गगनदीप कांग यांना मिळाला आहे!
डॉ. गगनदीप कांग यांनी ज्या रोटा विषाणूमुळे (व्हायरस) भारतात दर वर्षी एक लाख लोक मरतात त्यावर तोंडावाटे देता येईल अशी लस शोधून तयार केली आहे. भारतातील मुलांमध्ये होणाऱ्या पोटातील संसर्गावर त्यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे ठरले. आतडय़ातील संसर्ग हा मेंदूवरही परिणाम करीत असतो, त्यातून अनेक वाईट परिणाम होत असतात; परंतु डॉ. कांग यांच्या संशोधनाचा भर मानवी प्रतिकारशक्ती वाढवण्यावर आहे.
डॉ. गगनदीप या मूळ पंजाबमधील जालंधरच्या. त्यांचे वडील रेल्वेत अभियंता, तर आई शिक्षिका. बदलीच्या नोकरीमुळे वेगवेगळ्या शहरांत त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर प्राध्यापक म्हणून रुजू होऊन सूक्ष्मजीवशास्त्रात पीएचडी केली आणि संशोधनाचे क्षेत्र निवडले. कौटुंबिक जबाबदाऱ्या व संशोधन यांचा समतोल साधताना मोठी कसरत करावी लागत असल्याने संशोधनात महिलांची संख्या कमी आहे; पण कामाच्या वेळात लवचीकता ठेवली तर त्या या क्षेत्रात पुढे येऊ शकतात, असे डॉ. कांग यांचे मत आहे. जैवतंत्रज्ञान विभागाने जर विविध योजनांची व्यापकता वाढवली तरच ५० टक्के महिलांना संशोधक म्हणून काम करता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. हरयाणातील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत त्या कार्यकारी संचालक आहेत.
एकंदर तीनशे शोधनिबंध त्यांनी लिहिले आहेत. याआधी वुमन बायोसायंटिस्ट ऑफ दी इयर (२००६), रॉयल कॉलेज ऑफ पॅथॉलॉजिस्ट लंडनची फेलोशिप, इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेस व इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमी या संस्थांची फेलोशिप त्यांना मिळाली. रोटाव्हायरस लस उत्पादकांसाठी त्यांनी प्रशिक्षण केंद्र सुरू केले असून तेथे भारतच नव्हे, तर ब्राझील, चीन यांसह अनेक देशांतील उत्पादकांना प्रशिक्षण दिले जाते.