प्रतिकूल परिस्थिती ही काही अडचणी सांगण्याची सबब नाही. उलट लक्ष्यावर शक्ती एकवटण्यासाठी अशी परिस्थितीही पथ्यावरच पडू शकते, हे दाखवून दिले आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत राज्यातून प्रथम तर देशातून विसाव्या स्थानी आलेले डॉ. गिरीश दिलीपराव बदोले यांनी.
डॉ. बदोले हे मराठवाडय़ातील उस्मानाबाद जिल्ह्य़ातील. कर्नाटक सीमा भागातील उमरगा तालुक्यातील कसगी या गावचे. चार एकर कोरडवाहू जमिनीवर शेती करणारे वडील, त्यांना शेतीत मदत करणारी आई व एक भाऊ आणि डॉ. बदोले, असे चौकोनी कुटुंब. घराचा भार अर्थातच शेतीवरच. तेव्हा अशा परिस्थितीत जगताना पावलोपावली तडजोड करणे हे ओघाने आलेच. परिस्थिती सुधारायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे डॉ. बदोले यांच्या वडिलांना माहीत होते. त्यांनी दोन्ही मुलांना उत्तम शिक्षण द्यायचे ठरवले. प्रसंगी शिक्षणासाठी शेती गहाण ठेवून कर्जही काढण्याची तयारी ठेवली. कसगीतील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते दुसरीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढच्या शिक्षणासाठी त्यांना तुळजापूरला पाठवण्यात आले. तेथे सैनिकी विद्यालयात शिस्तीत डॉ. बदोले यांचे शिक्षण झाले. येथेच त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव रुजल्या. देशासाठी काही तरी करण्याचा संस्कार याच सैनिकी शाळेतून मिळाला.
दहावीला ८९ टक्के गुण घेतल्यानंतर लातुरातील दयानंद महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश मिळाला. मग बारावीला ९४ टक्के गुण मिळवून मुंबईच्या जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. एमबीबीएसचे शिक्षण वडिलांनी कर्ज काढूनच पूर्ण केले. त्यानंतर मुंबईतीलच ओएनजीसीमध्ये वैद्यकीय सेवा करताना ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांचे हाल, वेदना, परिस्थिती जवळून पाहता आली. तेव्हाच वैद्यकीय पेशा स्वीकारण्यापेक्षा प्रशासकीय सेवेतून सामाजिक परिस्थितीत काही बदल घडवता येतील का, या विचारांचे मूळ मनात रुजले आणि त्यादृष्टीने निश्चय करून वाटचाल सुरू ठेवली. परीक्षेची तयारी करताना एक विशिष्ट पद्धत निश्चित केली. अनुभवी मित्रांकडून मार्गदर्शन घेतले. मोबाइल हे केवळ संपर्काचे साधन मानले आणि त्यातील इंटरनेट सेवेचा केवळ अभ्यासासाठीच उपयोग करायचा, हे कटाक्षाने पाळले. विशिष्ट विषयांसाठी मित्र-तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे, मार्गदर्शन घेणे, याही बाजूवर भर दिला. प्रशासकीय सेवेत जाताना ग्रामीण भागात मूलभूत सुविधा देण्यावर भर असेल. विशेषत: शिक्षण, आरोग्य, रस्ते या सोयी-सुविधांच्या व्यवस्थेकडे अधिक लक्ष देण्याचा मनोदय डॉ. बदोले व्यक्त करतात.