अमेरिकेत २००१ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जो हल्ला झाला होता त्यानंतर परदेशातून येणाऱ्यांकडे संशयाने बघितले जात होते (अजूनही जाते).. त्या वेळी म्हणजे २००६ मध्ये प्रसिद्ध वैज्ञानिक गोवर्धन मेहता यांना व्हिसा नाकारण्यात आला होता. ‘त्यांचे संशोधनच पात्र नाही’ असे सांगून अधिकाऱ्यांनी त्यांचा अपमान केला खरा पण नंतर अमेरिकेला माफी मागावी लागली होती. याच मेहता यांना अलीकडे जर्मनीसारख्या प्रगत देशाने मानाचा ‘द क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिट’- म्हणजे आपल्याकडील पद्म पुरस्कारासारखा- सन्मान देऊन गौरवले आहे. मेहता यांचा जन्म राजस्थानातील जोधपूरचा. राजस्थान विद्यापीठातून बी. एस्सी. व एम.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएच. डी. पदवी घेतली. नंतरच्या काळात त्यांनी बंगळुरूची इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस, हैदराबाद विद्यापीठ व इतरही अनेक संस्थांत पायाभूत काम केले.
जर्मनीशी त्यांचा संबंध चाळीस वर्षांपूर्वीचा. १९९५ मध्ये त्यांना जर्मनीत प्रथमच अलेक्झांडर हम्बोल्ट पुरस्कार मिळाला होता. भारतात जर्मनीचे संपर्क केंद्र सुरू करण्यातही त्यांचाच मोठा वाटा होता. १९७८ मध्ये त्यांना सीएसआयआरचा ‘शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार’ मिळाला. त्यांना आजवर तब्बल चाळीस पुरस्कार मिळाले आहेत.
कार्बनी रसायनशास्त्र हा त्यांचा संशोधनाचा विषय असून कार्बन व त्यांचे बंध तसेच मूलद्रव्यातील नावीन्यपूर्ण गुणधर्म यावर त्यांनी काम केले आहे, औषधे म्हणजे प्रत्यक्षात रेणू असतात. रसायनशास्त्रात जे सौंदर्य आहे ते संयुगांच्या रचनेत आहे, असे त्यांना वाटते. त्यांनी एकूण ४०० शोधनिबंध लिहिले असून वेगवेगळ्या देशांत २५० व्याख्याने दिली आहेत. वार्धक्यात मेंदूचा ऱ्हास होत जातो व मेंदूच्या पेशी नवीन तयार होत नाहीत. त्यामुळे त्यांनी हा ऱ्हास रोखणारी औषधे तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. काही नैसर्गिक पदार्थ हा ऱ्हास रोखू शकतात, असा दावा ते करतात. संशोधनातील आनंदाचा संबंध ते पुरस्कारांशी जोडत नाहीत, पण संशोधनाला मान्यता मिळणे आवश्यक असते, असे त्यांचे मत आहे. समाज व सरकार कधीच वैज्ञानिकांच्या पाठीशी असत नाही ही खंत तेही व्यक्त करतात.
संशोधन हाच त्यांचा छंद. दुसरा कुठलाच व्यवसाय असा आनंद देऊ शकत नाही, असे ते मानतात. हैदराबाद विद्यापीठात, बसायला खुच्र्या नव्हत्या तेव्हापासून त्यांचे काम सुरू आहे. न थकता काम हे त्यांचे वैशिष्टय़. ते कधीही सुटी घेत नाहीत. आयुष्यातील यशाचे श्रेय ते पत्नी रंजनाला देतात.