नोबेल विजेते वैज्ञानिक असूनही कीप थॉर्न यांनी विज्ञानातील अवघड वाटा सामान्यजनांसाठी सोप्या करून दाखवल्या. नोबेलप्राप्त संशोधन समजण्यास खूपच कठीण; पण ते समाजापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न त्यांनी केले. सहसा संशोधन व सुगम विज्ञान लेखन ही दोन्ही कौशल्ये सर्वच वैज्ञानिकांना साध्य होत नाहीत, पण डॉ. थॉर्न हे त्याला अपवाद,  त्यामुळेच विज्ञान प्रसारासाठी केलेल्या कार्यासाठी त्यांना २०१८ चे ‘लुईस थॉमस’ पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. एखाद्या नोबेलविजेत्या वैज्ञानिकास विज्ञान लेखनासाठी पुरस्कार मिळावा हा दुर्मीळ योग.

सापेक्षतावादातून गुरुत्वाची संकल्पना सोपी करण्यासाठी थॉर्न यांचे नाव घेतले जाते. काल, अवकाश या गुरुत्वाच्या भौमितिक गुणधर्माना त्यांनी अचूक, पण सोप्या पद्धतीने लोकांसमोर मांडले. सामान्य लोकांसाठी ते विश्वाचे वाटाडे होतात. पुस्तके, भाषणे व माहितीपट या माध्यमांतून त्यांनी विज्ञान प्रसाराचे काम केले आहे. ‘ब्लॅक होल्स अँड टाइम वार्पस- आइनस्टाइन आउटरेजिअर लीगली’ हे पुस्तक १९९४ मध्ये त्यांनी लिहिले तेव्हापासून त्यांचा हा लेखन प्रवास अखंड सुरूच आहे. वर्महोल्स, ब्लॅकहोल्स यांसारख्या संकल्पना त्यांनी सोप्या पद्धतीने समजावून दिल्या आहेत. त्याला जोड आहे ती वैज्ञानिकांच्या ससंदर्भ कथांची. विज्ञानाला इतिहासाची डूब देत लेखनाची त्यांची हातोटी विलक्षणच. वाचकांना खिळवून ठेवून ज्ञानाचे घडे रिते करीत ते पुढे जातात. २०१४ मधील ‘इंटरस्टेलर’ या चित्रपटाचे ते सल्लागार होते. या चित्रपटाआधारे सापेक्षतावादाचे गणित उलगडण्यासाठी त्यांनीच नंतर ‘दि सायन्स ऑफ इंटरस्टेलर’ हे पुस्तकच लिहिले. लुईस थॉमस पुरस्कार हा खास ‘वैज्ञानिकातील कवी’ला दिला जातो, त्या अर्थाने थॉर्न हे विज्ञानाचे निरूपण करणारे प्रतिभाशाली कवीच आहेत.

थॉर्न यांना गुरुत्वीय लहरींच्या संशोधनासाठी २०१७ चे भौतिकशास्त्रातील नोबेल मिळाले आहे. ऊटाहमधील लोगान येथे जन्मलेले थॉर्न हे वयाच्या तेराव्या वर्षी एका पुस्तकाच्या दुकानात गेले होते, तेथे त्यांनी जॉर्ज गॅमॉ यांचे ‘वन, टू, थ्री.. इनफिनिटी’ हे पुस्तक पाहिले. त्यांनी ते तीन वेळा वाचले व भौतिकशास्त्रज्ञ व्हायचे पक्के केले. सध्या ते कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत फेनमन प्रोफेसर आहेत. भौतिकशास्त्रासारख्या रूक्ष विषयात ज्यांनी काव्य शोधले अशा दुर्मीळ भौतिकशास्त्रज्ञांपैकी ते आहेत. नोबेलइतकाच, त्यांच्यातील कवीचा हा सन्मान निश्चितच समर्पक आहे.

Story img Loader