वीज वितरणाच्या क्षेत्रात नवनवे प्रयोग करणारे डॉ. मुरहरी केळे यांची त्रिपुरा राज्याच्या वीज मंडळ अध्यक्षपदी झालेली निवड या क्षेत्रात काम करणाऱ्या नव्या अधिकाऱ्यांची उमेद वाढवणारी आहे. केळे मूळचे मराठवाडय़ातले. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील वाशी तालुक्यातील केळे गावचे. त्यांचे आई-वडील दोघेही शेतमजूर. लहानपणापासून गरिबीचे चटके सहन करणाऱ्या केळेंचे शालेय शिक्षण झाले ते रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात. विद्युत अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर १९९१ मध्ये तेव्हाच्या वीज मंडळात नोकरीला लागल.

खासगी कंपनीच्या माध्यमातून वीज वितरणाची पद्धत राज्यात सर्वप्रथम भिवंडी व नागपूरमध्ये अमलात आणली गेली. त्यात केळेंचे योगदान मोलाचे आहे. नोकरीत असतानाच व्यवस्थापनशास्त्र तसेच इतर अनेक विषयांत पदव्या मिळवणाऱ्या या अभियंत्याने वीज वितरणाचे खासगीकरण या विषयावर नागपूर विद्यापीठातून आचार्य ही पदवीसुद्धा मिळवली आहे. वितरण कंपनीत मुख्य अभियंता झाल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वीज प्रशिक्षण संस्थेत बराच काळ काम केले. या संस्थेकडून त्यांची दोन पुस्तकेसुद्धा प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत शेजारच्या मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या वीज वितरण कंपनीचे कार्यकारी संचालकपद केळे यांना दिले. तिथे तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर केळे अकोला परिमंडळात मुख्य अभियंता म्हणून रुजू झाले. आता काही महिन्यांतच त्यांची त्रिपुरा राज्य वीज मंडळाचे प्रमुख म्हणून निवड झाली आहे. या राज्याचा भौगोलिक आकार अगदीच लहान असला तरी तेथे घरोघरी वीज पोहोचवण्याचे मोठे आव्हान केळे यांच्यासमोर आहे. सध्या त्रिपुरात आठशे मेगावॅट वीज निर्माण केली जाते. या राज्याची सध्याची गरज केवळ चारशे मेगावॅट आहे. उर्वरित वीज शेजारच्या राज्यांना तसेच बांगलादेशाला विकली जाते. घनदाट जंगलामुळे या राज्यात अनेक गावांत वीज नाही. तेथे वीजपुरवठा करण्याचे काम केळे यांच्या प्राधान्यक्रमावर आहे. केळे यांचा लेखनप्रांतातील वावरसुद्धा दखलपात्र आहे. त्यांनी संपादित केलेली ‘अहिल्यादेवी होळकर’ व ‘संतवाणी’ ही दोन पुस्तके प्रसिद्ध असून त्यांनी अनेक वृत्तपत्रांत स्तंभलेखनसुद्धा केले आहे. ‘नानी’, ‘शब्दशिल्प’ अशा पुस्तकांसोबतच त्यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले ‘जगी ऐसा बाप व्हावा’ हे चरित्रात्मक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. अखेपर्यंत वारकरी म्हणून वावरणाऱ्या वडिलांवर लिहिलेल्या या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. मराठवाडा विकास संघातर्फे मराठवाडा भूषण, तसेच कवी नारायण सुर्वे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मिळवणारे केळे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सदस्यही आहेत. वीज वितरणाच्या क्षेत्रात अनेक नव्या कल्पना राबवणाऱ्या केळेंनी अनेक विद्यापीठांमध्ये तसेच विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. येत्या तीन वर्षांत त्रिपुरा राज्यातील वीज क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील अभियंत्यांच्या वाटय़ाला प्रथमच परराज्यात अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
Story img Loader