कुठल्याही अवकाश संशोधन मोहिमेत संदेश यंत्रणा ही पुरेशी सक्षम असावी लागते, किंबहुना अवकाशात सोडलेल्या यानाचे सारथ्यच त्यातून केले जात असते. चांद्रयान-१ मोहीम यशस्वी होण्यात त्याच्या दूरसंदेश यंत्रणेचे असेच महत्त्व होते. ही यंत्रणा विकसित करण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे वैज्ञानिक डॉ. एस.के. शिवकुमार यांचा मोठा वाटा होता. त्यांचे नुकतेच निधन झाल्याने आपण एक अनुभवी अवकाश वैज्ञानिक गमावला आहे.
इस्रोच्या उपग्रह केंद्राचे ते माजी संचालक होते. चांद्रयान-२ मोहिमेसाठीही शिवकुमार यांचे हे मूलभूत काम उपयोगी ठरणार आहे. अवकाशयानांचे नियंत्रण पृथ्वीवरील संदेशांद्वारे करणाऱ्या प्रणाली त्यांनी विकसित केल्या होत्या. यात लाखो मैल दूर अंतरावर फिरणाऱ्या उपग्रहांशी संपर्क करणाऱ्या ३२ मीटर डिश अँटेनाचा समावेश होता. बंगळूरुनजीक बायलुलू येथे ‘डीप स्पेस नेटवर्क’ ही संदेश यंत्रणा उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. कुठलाही उपग्रह सोडल्यानंतर तो व्यवस्थित सुरू असल्याचे संकेत हे या केंद्रात प्राप्त झालेल्या संदेशातून मिळत असतात. एकदा तिथे संदेश योग्य प्रकारे प्राप्त झाला, की उपग्रहाचे पुढचे काम व्यवस्थित सुरू राहण्याची खात्री तेथेच मिळत असते. इसॅक व इसट्रॅक या इस्रोच्या दोन संस्थांचे संचालक म्हणून त्यांनी काम केले होते. ‘पद्मश्री’ (२०१०) तसेच कर्नाटक सरकारचा ‘राज्योत्सव पुरस्कार’ त्यांना मिळाला होता. म्हैसूरमध्ये जन्मलेल्या शिवकुमार यांनी म्हैसूरु विद्यापीठातून विज्ञान पदवी घेतली. त्यानंतर ते विद्युत अभियांत्रिकीत बीई झाले होते. बेंगळूरुच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या प्रतिष्ठित संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीत ‘एमटेक’ पदवी घेतली. त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील ‘ट्रॅकिंग कमांड अँड नेटवर्क’ या विभागातून १९७८ मध्ये झाली. त्यानंतर १९७८ ते १९९८ या काळात त्यांनी या विभागात अनेक पायाभूत यंत्रणा विकसित केल्या. या काळात त्यांनी भास्कर, अॅपल, आयआरएस, इन्सॅट यांसारख्या विविध भारतीय उपग्रहांच्या मोहिमांत नियोजन, विश्लेषण व संचालन या कामात पुढाकार घेतला. आयआरएस-१ बी व आयआरएस-१ सी या उपग्रहांच्या मोहिमांचे ते संचालक होते. सप्टेंबर १९९८ ते नोव्हेंबर २०१० दरम्यान ‘इस्ट्रॅक’ विभागात काम केल्यानंतर त्यांनी ‘यूआरएसएसी’ या इस्रोच्या विभागाची सूत्रे हाती घेतली होती. सुमारे दोन दशके इस्रोमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करताना त्यांनी त्यांच्यातील नेतृत्वगुणांची चमक अनेक मोहिमा यशस्वी करताना दाखवून दिली होती.