मुळातच भारतामध्ये विज्ञान क्षेत्रात महिलांची संख्या बोटावर मोजण्याइतकी, त्यात मुस्लीम महिला संशोधकांची संख्या किती नगण्य असेल याची कल्पनाच केलेली बरी. याही स्थितीत काही मुस्लीम महिला संशोधन क्षेत्रात आघाडीवर आहेत, त्यातील एक म्हणजे डॉ. शमा परवीन. त्यांना जामिया मिलीया इस्लामिया संस्थेचा  प्रतिष्ठेचा ‘सयीदा बेगम महिला वैज्ञानिक पुरस्कार’ जाहीर  झाला आहे. जयपूर येथे नुकताच झिकाचा विषाणू सापडला, काहीजणांना बाधाही झाली. यात मुलांच्या मेंदूची अपुरी वाढ होते. अशा वेळी आपल्याला ज्या वैज्ञानिकांची आठवण यायला हवी त्यांत परवीन यांचा समावेश आहे. परवीन यांच्यासारख्या वैज्ञानिक महिला त्यासाठी अगोदरच विषाणूंचे संशोधन करीत आहेत. सध्या त्या ‘सेंटर फॉर डिसिप्लिनरी रीसर्च इन बेसिक  सायन्सेस’ या संस्थेत काम करीत असून विषाणूंच्या रेणवीय जीवशास्त्राचा वेध त्यांनी संशोधनातून घेतला आहे. चिकुनगुनिया, डेंग्यू, झिका व श्वसनारोगांतील  विषाणू, मानवातील मेटॅन्यूमोव्हायरस विषाणूंवर त्यांचे संशोधन आहे. अनेक आंतरराष्ट्रीय नियतकालिकात त्यांचे संशोधन प्रसिद्ध झाले असून ते त्याचे संदर्भही  मोठय़ा प्रमाणात घेतले गेले आहेत.अलाहाबाद येथील नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या सदस्यपदी त्यांची नुकतीच निवड झाली आहे.  १९३० मध्ये स्थापन झालेल्या या भारतातील सर्वात जुन्या संस्थेचे सदस्यपद हे प्रतिष्ठेचे मानले जाते. ब्राझीलमध्ये २०१५ मध्ये झिकाचा प्रादुर्भाव झाला त्यावेळी भारतात फार मोठय़ा प्रमाणात संसर्ग झाला नव्हता, पण डॉ. परवीन यांनी हा रोग भारतातही येऊ शकतो, असे तेव्हाच सांगितले होते. याच महिन्यात जयपूर येथे झिकाचे रुग्ण सापडल्याने त्यांनी दिलेला धोक्याचा इशारा खरा ठरला आहे. आपल्या देशात विषाणूंना अनुकूल असे वातावरण आहे त्यामुळे नवजात बालकांच्या  मेंदूचा आकार लहान करून टाकणाऱ्या मायक्रोसेफली रोगास कारण ठरणारा झिका विषाणू धोकादायक आहे. चिकुनगुन्या व डेंग्यू यांवरही त्यांचे संशोधन असून त्यांच्या मते दर तीनचार वर्षांनी डेंग्यू व चिकुनगुनियाचे चक्र वाढत  राहते. विशेष म्हणजे डेंग्यू, चिकुनगुनिया , झिका यांचे विषाणू जवळपास सारखेच आहेत.  एडिस एजिप्ती डासांमुळे डेंग्यू व चिकुनगुनिया वाढत असताना झिकासाठी यापुढे तयार असले पाहिजे हे त्यांनी २०१५ मध्येच सांगितले होते. परवीन व त्यांच्या सहकाऱ्यांनी झिका विषाणूंच्या काही प्रथिनांची ओळख पटवून त्यांना रोखण्यासाठी संशोधन केले असून त्याचे प्रत्यक्ष परिणाम हाती येण्यास वेळ लागणार आहे.

Story img Loader