अमेरिकेत येत्या मे महिन्यात ‘यूएस नॅशनल इनव्हेन्टर्स हॉल ऑफ फेम’मध्ये समावेशाने ज्या कल्पक वैज्ञानिकांना गौरवण्यात येणार आहे त्यात भारतीय वंशाच्या सुमिता मित्रा यांचा समावेश आहे. गेली तीस-पस्तीस वर्षे रसायनशास्त्रातील ज्ञानाचा वापर त्यांनी मानवी कल्याणासाठी केला. दातांचे आरोग्य व सौंदर्य टिकवण्यासाठी त्यांनी नॅनोकणांवर आधारित दंतभरण (नॅनो डेंटल फिलर्स) पदार्थ तयार केले, ही त्यांची सगळ्यात महत्त्वाची कामगिरी. अमेरिकन केमिकल सोसायटीत त्या विज्ञान प्रशिक्षक होत्या. त्यांनी जे दंतभरण तयार केले आहे त्याचे नाव आहे फिलटेक, त्याचे रीतसर व्यापारचिन्हही घेण्यात आले आहे. थ्री एम ओरल केअरमध्ये काम करताना त्यांनी हे दंतभरण तयार करण्यात यश मिळवले. या अर्थाने त्या ‘कॉर्पोरेट वैज्ञानिक’ असल्या तरी त्यांची ही कामगिरी कुठेही उणावत नाही. कारण शेवटी त्यांचे संशोधन लोकोपयोगीच ठरणार. एकंदर ९८ पेटंट सुमिता मित्रा यांच्या नावावर आहेत.

मित्रा या मूळ पश्चिम बंगालच्या. कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी रसायनशास्त्रात बीएस्सी ही पदवी घेतली. कार्बनी रसायनशास्त्रात त्यांनी एमएस्सी पदवी कोलकाता विद्यापीठातून घेतली. नंतर त्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेल्या. तेथे त्यांनी मिशिगन विद्यापीठातून कार्बनी व बहुवारिक रसायनशास्त्रात पीएच.डी. केली. थ्री एम कंपनीतील ३० वर्षांच्या सेवेनंतर २०१० मध्ये त्या निवृत्त झाल्या, आता त्या मित्रा केमिकल कन्सलटन्सी ही कंपनी त्यांच्या पतीसह चालवतात. २००९ मध्ये त्यांना हिरोज ऑफ केमिस्ट्री पुरस्कारने गौरवण्यात आले. त्यांनी व्ह्रिटेमर, ग्लास आयनोमर कोअर बिल्डअप, व्ह्रिटेबाँड, प्लस लाइट क्युअर ग्लास आयनोमर लायनर व बेस, फिल्टेक अशी अनेक दंत उत्पादने तयार केली आहेत. अमेरिकेत दंतआरोग्यासाठी विम्याची वार्षिक उलाढाल पाच अब्ज डॉलर्सची असून यापैकी बहुतेक खर्च दुसऱ्यांदा होणाऱ्या दंतक्षरणावर होतो. डॉ. मित्रा यांनी काही संमिश्रांपासून तयार केलेली दंतभरणे भक्कम असल्याने दंतरोगतज्ज्ञांकडे वारंवार जाण्याची वेळच येत नाही. त्यांच्या या संशोधनाने थ्री एम कंपनीला दोन अब्ज डॉलर्सचा फायदा झाला हेही एक व्यावसायिक यश आहे. त्यांना रसायनशास्त्राचे ज्ञान मुलांपर्यंत पोहोचवण्यात तेवढाच आनंद वाटतो. त्या व त्यांचे पती सॅम यांनी मिनेसोटा येथील शाळांमधून मुलांना रसायनशास्त्राची गोडी लावण्याचे काम केले आहे. त्यासाठी दोघे रोज १२० मैल प्रवास करतात. सुमिता यांनी एकूण १२० शोधनिबंध लिहिले आहेत. विज्ञान व व्यावसायिकता, विज्ञान व दैनंदिन समस्या, विज्ञान व शिक्षण अशा अनेक पैलूंतून एक चतुरस्र वैज्ञानिक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.

Story img Loader