मराठी भाषेच्या सर्वक्षेत्रीय वाताहतीचे चित्र आता इतके सवयीचे झाले आहे, की त्याचे कुणालाच काही वाटेनासे झाले आहे. परंतु मराठीला ज्ञानव्यवहाराची भाषा करण्यासाठी आपापल्या स्तरावर भाषिक-साहित्यिक संशोधनात झोकून देऊन काम करणाऱ्यांची एक पिढीच साठोत्तरी महाराष्ट्रात होती. त्या पिढीचे प्रतिनिधी असणाऱ्या डॉ. सुरेश रामकृष्ण चुनेकर यांचे सोमवारी निधन झाले.
शं. ग. दातेंसारख्या सूचीकारांनी सुरू केलेले मराठीतील सूचीकार्य व्रतस्थपणे पुढे नेणारे संशोधक अशी सु. रा. चुनेकरांची ठळक ओळख. ती इतकी की, त्यांनी सखोल समीक्षालेखन व साक्षेपी संपादनात दाखवलेले वाङ्मयीन कर्तृत्व दुर्लक्षित राहावे. सूची-वाङ्मयातील संशोधनाची शिस्त आणि साहित्याभ्यासातील समीक्षकीय दृष्टी यांचा विलक्षण संयोग त्यांच्या लेखन-संपादनात होता. अगदी, १९६३ साली माधव जूलियनांच्या साहित्यावर प्रबंध लिहून चुनेकर पीएच.डी. झाले; त्या प्रबंधातही हा संयोग साधला होता. म्हणूनच या प्रबंधाला त्या वर्षीचा उत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार तर मिळालाच; पण दहाएक वर्षांनी नव्या माहितीसह पुनर्लेखन करून मौजतर्फे तो ग्रंथरूपातही आला. ‘माधवराव पटवर्धन : वाङ्मयदर्शन’ या शीर्षकाने. पुढे चुनेकरांनी जूलियनांच्या समग्र कवितांचेही दोन खंडांत संपादन केले होते.
याशिवाय- ‘सहा साहित्यकार’ हे हरिभाऊ, केशवसुत, खाडिलकर, गडकरी, जूलियन, शिरवाडकर अशा सहा साहित्यकारांचे वाङ्मयीन व्यक्तित्व रेखाटणारे छोटेखानी पुस्तक असो वा ‘जयवंत दळवी यांची नाटके : प्रवृत्तिशोध’सारखे पुस्तक किंवा ‘अंतरंग’ हा महत्त्वाच्या साहित्यकृतींचा अन्वयार्थ लावणारा लेखसंग्रह असो; चुनेकरांच्या संशोधकीय समीक्षादृष्टीचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही. म्हणूनच की काय, ‘जीएंच्या निवडक पत्रां’चा चौथा खंड असो वा यूजिन ओ’नीलच्या नाटकाचा जीएंनी केलेला अनुवाद (‘दिवस तुडवत अंधाराकडे’) असो, त्याच्या संपादनाची जबाबदारी चुनेकरांकडे आली. हे करत असतानाच चुनेकर पंचवीसेक वर्षे मराठीतील विविध सूचींचा अभ्यास आणि संग्रह करत होते. त्याचेच फलित म्हणजे ‘सूचींची सूची’ हा संकलन-ग्रंथ! तब्बल ६७३ सूचींची माहिती त्यात मिळते. मराठीतील सूचीवाङ्मयाचे त्यांनी या ग्रंथाद्वारे जणू व्यवस्थापन करून एक मौलिक संदर्भसाधन उपलब्ध करून दिले. मुंबई विद्यापीठ, पुढे संगमनेर महाविद्यालयात आणि मग दीर्घकाळ पुणे विद्यापीठात त्यांनी मराठीचे अध्यापन केले. अनेक विद्यार्थ्यांना संशोधनाची दिशा दाखवली, त्यांना लिहिते केले. ‘मराठी संशोधन पत्रिके’चे संपादन आणि ‘मराठी विश्वकोशा’तील काही निवडक नोंदी याव्यतिरिक्त ते संस्थात्मक, शासकीय कामकाजात फारसे सहभागी झाले नाहीत. नेमस्त भूमिकेतून व्रतस्थपणे संशोधन हेच ब्रीद त्यांनी अखेपर्यंत जपले.