व्यवसायाने दंतशल्यचिकित्सक असले तरी डॉ. विद्याधर सीताराम करंदीकर यांची ही काही तेवढीच ओळख नव्हती. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. कवी, बालनाटककार, मराठी आणि संस्कृत भाषेचे ते जाणकार होतेच, पण सावरकरांच्या साहित्याचा त्यांचा विशेष अभ्यास होता.
डॉ. करंदीकर यांचा जन्म २ नोव्हेंबर १९५८ रोजी कणकवली येथे झाला. शालेय शिक्षण तेथेच आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. महाविद्यालयीन जीवनातच त्यांना साहित्याची गोडी निर्माण झाली. अनेक साहित्यिकांना भेटून ते मार्गदर्शन घेत. पदवीधर झाल्यानंतर ते कणकवली येथे आले व दंतवैद्यक म्हणून त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. दुसरीकडे विविध विषयांवरील त्यांचे वाचन चालूच होते. काही वर्षांतच मराठी आणि संस्कृत भाषेतील चालताबोलता संदर्भग्रंथ म्हणून त्यांची ओळख बनली. ‘चंदनी धुक्याचे’ हा त्यांचा कवितासंग्रह खूप गाजला. त्यातील ‘किनारा’ या कवितेचा सहावीच्या पाठय़पुस्तकात समावेश करण्यात आला होता. बालसाहित्यिक म्हणूनही डॉ. करंदीकर प्रसिद्ध होते. बालसाहित्यावरील त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यातील ‘पहिला माझा नंबर’ या बालनाटय़ाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. पीएच.डी. साठी ‘मराठी कवीची नाटय़सृष्टी- स्वरूप विशेष’ या विषयावर त्यांनी प्रचंड संशोधन करून प्रबंध लिहिला. या प्रबंधाला मुंबई विद्यापीठातर्फे दिला जाणारा अ. का. प्रियोळकर पुरस्कार लाभला होता. डॉ. करंदीकर हे विद्यार्थ्यांसाठी निबंधलेखनाच्या कार्यशाळा आवर्जून घेत असत. वि. स. खांडेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या निवडक साहित्यावर आधारित ‘अमृतधारा’ या कार्यक्रमाचे लेखन डॉ. करंदीकर यांनी केले होते. या कार्यक्रमाचे मुंबई दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रसारण करण्यात आले होते. विंदा करंदीकर यांच्या साहित्यावर आधारित ‘स्वच्छंद’ हा कार्यक्रम प्रत्यक्ष विंदांसमोर त्यांनी सादर केला होता. विंदांनाही हा कार्यक्रम आवडल्याने जाहीरपणे त्यांनी याचे कौतुक केले होते.
सावरकरांच्या समग्र साहित्याचा त्यांचा दांडगा व्यासंग होता. दंतवैद्यक असल्याने समाजातील विविध क्षेत्रांतील जाणकारांचा त्यांच्याशी संबंध येत असे. हा व्यवसायही ते निष्ठेने आणि सचोटीने करीत असत. कोमसापशी ते दीर्घकाळ निगडित होते. कोमसापच्या ‘झपूर्झा’ या मासिकाचे ते अनेक वर्षे संपादक होते. कणकवली पालिकेने ‘कनकरत्न’ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते.
या पुढेही अनेक विषयांवर लिखाण करण्याचा त्यांचा मानस होता. त्या दृष्टीने त्यांचे वाचनही सुरू होते. पण शुक्रवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली व शनिवारी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. प्रसिद्धिपराङ्मुख असलेल्या डॉ. करंदीकर यांच्या निधनाने साहित्य व सांस्कृतिक चळवळीचे अतोनात नुकसान झाल्याची भावना कोकणात व्यक्त होत आहे.