आयव्हीएफ उपचारपद्धती, सरोगसीच्या माध्यमातून भाडोत्री मातृत्व शोधू पाहणारी ती, टेस्टटय़ूब बेबी.. या संकल्पना आता नवीन राहिल्या नाहीत. पीरियड, संततिनियमनाची साधने, गर्भधारणा झाली की नाही याच्या सोप्या चाचणीच्या जाहिरातीही आता दूरचित्रवाणीवर सर्रास पाहायला मिळतात. पण सत्तरच्या दशकात लैंगिकता किंवा कामशास्त्र याविषयी उघडपणे बोललेही जात नव्हते. कामविज्ञानासंबंधी प्रा. र. धों. कर्वे आणि के. पी. भागवत हे दोन अपवाद सोडले तर अन्य कुणाची माहितीपूर्ण पुस्तकेही मराठीत उपलब्ध नव्हती. अशा काळात डॉ. विठ्ठल प्रभू यांनी कामविज्ञानावर लेखन सुरू केले आणि पुढे याच विषयावर सुमारे तीन डझन पुस्तके लिहून या विषयाचे विविध पैलू त्यांनी वाचकांसमोर मांडले.
मुंबईतील दादरसारख्या मध्यवर्ती भागात ते वाढले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथेच त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. तेव्हा त्यांच्या एका रुग्णाचा अनुभव धक्कादायक होता. विवाहाच्या पहिल्या रात्रीनंतर दुसऱ्याच दिवशी एका नवविवाहितेने आत्महत्या केली, असे तिच्या पतीने सांगिल्यावर डॉ. प्रभू अस्वस्थ झाले. तरुण पिढीला कामविज्ञानाची माहिती देणे गरजेचे आहे, असे त्यांना त्याच्या बोलण्यातून जाणवले. मग त्यांनी कामविज्ञानाचा सखोल अभ्यास सुरू केला. तो करताना लैंगिकता व काम यात मूलभूत फरक असल्याचे डॉ. प्रभू यांना जाणवलेच, पण कामविज्ञानाचा आवाका फार प्रचंड असल्याचे ध्यानात आले. वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र अशा अनेक विज्ञान शाखांशी त्याचा संबंध असल्याचे लक्षात आले. त्यांचे गुरू भा. नी. पुरंदरे यांच्याशी मग या विषयावर त्यांनी अनेकदा चर्चा केली. पालकांची जबाबदारी, प्रेमाचे स्वरूप, निसर्गाची योजना, स्त्री-पुरुषांच्या कामजीवनातील गरजा, लैंगिकतेमुळे उद्भवणारे सामाजिक प्रश्न असे अनेक मुद्दे समोर आले. त्यातूनच मग ‘निरामय कामजीवन’ हे पुस्तक साकारले.
हे पुस्तक आले १९८२ साली आणि काही काळातच त्याने खपाचा विक्रम केला. त्या काळात याची पहिली आवृत्ती पाच हजार प्रतींची काढण्यात आली होती. गेल्या ३७ वर्षांत या पुस्तकाच्या ३४ आवृत्त्या निघाल्या. विशेष म्हणजे यातील अनेक आवृत्त्यांमध्ये वाचक तसेच तज्ज्ञांच्या सूचनेवरून नवीन प्रकरणेही डॉ. प्रभू यांनी समाविष्ट केली. तीन दशकांपूर्वीच्या काळात या पुस्तकावर टीकाही झाली. तरीही या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला. ज्योती कुंटे यांनी त्याचा हिंदी अनुवाद केला व तोही वाचकप्रिय ठरला.
याशिवाय ‘उमलत्या कळ्यांचे प्रश्न’, ‘प्रश्नोत्तरी कामजीवन’, ‘तारुण्याच्या उंबरठय़ावर’ यांसारखी त्यांची अनेक पुस्तके गाजली. तीन पुस्तकांना सरकारचे व अन्य पुरस्कारही मिळाले. डॉ. प्रभू हे कौन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अॅण्ड पेरेंटहूड या संस्थेचे मानद अध्यक्ष होते. समुपदेशनाद्वारे सोप्या शब्दांत लैंगिक शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी पाच दशके केले. ९० वर्षांचे कृतार्थ आयुष्य जगल्यानंतरबुधवारी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.