‘तुम्ही देशाचे अर्थमंत्री असता तर देशाचा अर्थसंकल्प कसा बनविला असता’ या साधारणत: तीन दशकांपूर्वी वित्त मंत्रालयाने आयोजित केलेल्या स्पर्धेत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. यशवंत रारावीकर यांनी आपला अर्थसंकल्प सादर केला होता. तत्कालीन अर्थमंत्र्यांचा अर्थसंकल्प आणि डॉ. रारावीकर यांनी स्पर्धेसाठी पाठविलेला अर्थसंकल्प बराचसा सारखा होता. स्पर्धेत ते अव्वल ठरले. केंद्रीय अर्थसंकल्प पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. अर्थशास्त्र हा विषय मुळातच बहुतांशी जणांना किचकट वाटणारा. या विषयाची काठिण्य पातळी हेच आव्हान समजून ते सहजपणे मांडणे ही रारावीकर यांची आवडच बनली होती.  कौटुंबिक जीवनात अतिशय कठीण प्रसंग, दु:ख वाटय़ाला येऊनही रारावीकरांनी अभ्यास, व्यासंग सोडला नाही. जळगाव हे त्यांचे मूळ गाव. पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण घेऊन १९८० मध्ये त्यांनी ‘सार्वजनिक वित्तपुरवठा’ या विषयात पीएचडी प्राप्त केली. सलग चार दशके अहमदनगर, नाशिक, पुणे येथील महाविद्यालयांत ज्ञानदानाचे काम निष्ठेने आणि अतिशय आवडीने केले. विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राची गोडी लावण्यावर त्यांचा भर असे. अनेक संशोधकांना संशोधनासाठी उद्युक्त केले. मार्गदर्शन करून प्रेरणा दिली. हजारो व्याख्याने देऊन अर्थजागरूकता आणण्याचा प्रयत्न केला.

पाच पुस्तके, शेकडो विचारप्रवर्तक लेख आणि भाषणांमधून आर्थिक विषयावर त्यांनी भाष्य केले. त्यांची मांडणी सामान्य माणसापासून अर्थतज्ज्ञांपर्यंत सर्वाना उपयुक्त आणि दिशादर्शक होती. त्यांनी लिहिलेल्या शोधनिबंधांना चार सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्य पदके मिळाली. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. केंद्रीय कृषी मंत्रालयाने त्यांच्या कृषी विषयातील संशोधनासाठी पुरस्कार प्रदान केला. भारताच्या आर्थिक आणि वित्तीय धोरणावरील शोधनिबंधाला नवी दिल्लीस्थित ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह’ संस्थेने पुरस्काराने गौरविले. पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळात कार्यरत असताना त्यांनी अभ्यासपूर्ण शैलीने छाप पाडली. नाशिक महानगरपालिका, अल्पबचत खाते, महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ यांसारख्या अनेक संस्थांचे ते आर्थिक सल्लागार राहिले. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांशी ते संलग्न होते.

नाशिकमधून प्रकाशित होणाऱ्या ‘थिंक लाइन’ या अर्थविषयक द्वैमासिकाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला. सर्वोत्कृष्ट शिक्षक, मार्गदर्शक, लेखक अशा सर्व भूमिकांत रारावीकर वावरले. त्यांच्या निधनाने अर्थशास्त्राचा सूक्ष्मपणे अभ्यास करणारा आणि सोपी मांडणी करणारा अभ्यासक हरपला आहे.

Story img Loader