‘तुम्ही देशाचे अर्थमंत्री असता तर देशाचा अर्थसंकल्प कसा बनविला असता’ या साधारणत: तीन दशकांपूर्वी वित्त मंत्रालयाने आयोजित केलेल्या स्पर्धेत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. यशवंत रारावीकर यांनी आपला अर्थसंकल्प सादर केला होता. तत्कालीन अर्थमंत्र्यांचा अर्थसंकल्प आणि डॉ. रारावीकर यांनी स्पर्धेसाठी पाठविलेला अर्थसंकल्प बराचसा सारखा होता. स्पर्धेत ते अव्वल ठरले. केंद्रीय अर्थसंकल्प पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. अर्थशास्त्र हा विषय मुळातच बहुतांशी जणांना किचकट वाटणारा. या विषयाची काठिण्य पातळी हेच आव्हान समजून ते सहजपणे मांडणे ही रारावीकर यांची आवडच बनली होती. कौटुंबिक जीवनात अतिशय कठीण प्रसंग, दु:ख वाटय़ाला येऊनही रारावीकरांनी अभ्यास, व्यासंग सोडला नाही. जळगाव हे त्यांचे मूळ गाव. पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण घेऊन १९८० मध्ये त्यांनी ‘सार्वजनिक वित्तपुरवठा’ या विषयात पीएचडी प्राप्त केली. सलग चार दशके अहमदनगर, नाशिक, पुणे येथील महाविद्यालयांत ज्ञानदानाचे काम निष्ठेने आणि अतिशय आवडीने केले. विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राची गोडी लावण्यावर त्यांचा भर असे. अनेक संशोधकांना संशोधनासाठी उद्युक्त केले. मार्गदर्शन करून प्रेरणा दिली. हजारो व्याख्याने देऊन अर्थजागरूकता आणण्याचा प्रयत्न केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा