साठच्या दशकातील वलयांकित, लोकप्रिय क्रिकेटपटूंमध्ये टेड डेक्स्टर यांचे स्थान खूप वरचे होते. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, शैलीदार फलंदाजी व कसोटी कारकीर्दीत अर्ध्याहून अधिक सामन्यांमध्ये इंग्लंडचे नेतृत्व या बाबी त्यांची लोकप्रियता वाढवण्यास पुरेशा होत्या. पण क्रिकेटपटूपलीकडे ते आणखी बरेच काही होते. त्यांच्या जीवनपटावर एखादी खुमासदार कादंबरी आजही सहज बेतू शकते. किंवा एखादी ओटीटी मालिका तुफान लोकप्रिय बनवण्याचे सारे कंगोरे त्या जीवनपटात होते. श्रीमंत घरात जन्म आणि उंची शाळांत अध्ययन. पदवी महाविद्यालयांमध्ये केवळ क्रिकेटच्या जोरावरच निवड, पण सारे लक्ष खेळात लागल्याने दोन पदवी अभ्यासक्रम डेक्स्टर यांनी अर्धवट सोडले. त्यांची निवड झाल्यानंतर सुरुवातीच्या मालिकांत- वि. न्यूझीलंड आणि वि. वेस्ट इंडिज- त्यांनी बऱ्यापैकी चमक दाखवली. पण अॅशेस मालिकेसाठी त्यांची निवड जरा उशिरानेच झाली. १९५८ ते १९६८ दरम्यान डेक्स्टर इंग्लंडकडून ६२ कसोटी सामने खेळले. त्यांत ४७.८९च्या सरासरीने त्यांनी ४५०२ धावा जमवल्या. त्यांची फलंदाजी सरासरी आजवर केवळ १२ इंग्लिश फलंदाजांनाच ओलांडता आली. डेक्स्टर मध्यमगती गोलंदाजीही करीत, तरी ६६ बळी मिळवूनही त्यांची ओळख फलंदाज अशीच राहिली. डेक्स्टर गोल्फही उत्तम खेळत. ते हौशी वैमानिक होते आणि एकदा इंग्लंड ते ऑस्ट्रेलिया असे दीर्घ पल्ल्याचे उड्डाण त्यांनी सहकुटुंब केले होते. क्रिकेट खेळत असतानाच एकदा त्यांनी हुजूर पक्षाच्या तिकिटावर ब्रिटिश पार्लमेंटची निवडणूकही लढवली. कारकीर्दीच्या सुरुवातीला जुगाराने त्यांना जवळपास कफल्लक बनवले होते. परंतु अडचणीच्या काळात त्यांना क्रिकेटने हात दिला. कसोटी कारकीर्दीतील जवळपास अर्धा काळ म्हणजे ३० कसोटी सामन्यांत डेक्स्टर यांनी इंग्लंडचे नेतृत्व केले. त्यांच्याकडे युक्त्या, क्ऌप्त्या भरपूर असायच्या, पण संघ सहकाऱ्यांच्या गळी त्या उतरवण्यात ते कमी पडायचे. अॅशेस मालिकेत कर्णधार म्हणून त्यांनी जमवलेल्या ४००हून अधिक धावा आजही एक विक्रम ठरतो. सतत काही तरी नवीन करण्याच्या ध्यासातून मर्यादित षटकांचे क्रिकेट, चार दिवसांचे प्रथम श्रेणी सामने, क्रिकेटपटूंच्या मानांकनाची पद्धती, एमसीसीमध्ये महिलांना समान वागणूक देण्याविषयीची सूचना या सुधारणा सुरुवातीला त्यांनी सुचवल्या होत्या. ६०च्या दशकात विशेषत वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांना निडर फटकेबाजीने उत्तर देणारे टेड स्वत:च्या संघातील असामान्य वेगवान गोलंदाजाचा- फ्रेडी ट्रमन- विश्वास मात्र जिंकू शकले नाहीत. कारण? ‘टेडकडे डार्विनपेक्षा अधिक सिद्धान्त तयार असतात,’ अशी फ्रेडीची प्रेमळ तक्रार! टेड डेक्स्टर यांचे नुकतेच वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले.
टेड डेक्स्टर
कसोटी कारकीर्दीतील जवळपास अर्धा काळ म्हणजे ३० कसोटी सामन्यांत डेक्स्टर यांनी इंग्लंडचे नेतृत्व केले.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-09-2021 at 01:08 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England international crickete ted dexter profle zws