भरभराटीतून नवनवी वळणे घेत नव्या क्षेत्रांमध्ये पाऊल ठेवायचे, ही उद्योजकांची रीत. ‘एस्कॉर्ट’ उद्योगसमूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजन नंदा यांनीही, प्रसंगी हात पोळून घेऊन ती रीत पाळली. मोबाइल क्षेत्रात सुरुवातीलाच, १९९४ मध्ये केलेल्या मुलुखगिरीचे चटके, त्यातून झालेली कर्जे, त्यामुळे विकावे लागलेले अन्य उद्योग.. पुढे, भागीदार-कंपन्यांनी सोडलेली साथ, या साऱ्याचे सावट आता कुठे निघून जात असताना राजन नंदा यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर व्यक्त झालेली हळहळ, माणूस म्हणून त्यांचे मोठेपण सांगणारी आहे.

‘एस्कॉर्ट’ या कंपनीचा इतिहास राजन यांचे वडील हरप्रसाद आणि काका युदी नंदा यांनी लाहोरमध्ये १९४४ सालात स्थापलेल्या एजन्सीपर्यंत भिडणारा.  राजन नंदा हे १९६५ पासून या कंपनीत लक्ष घालू लागले आणि १९९४ मध्ये अध्यक्षपदी आले. तेव्हापासून, उद्योगसमूह म्हणून ‘एस्कॉर्ट्स’च्या विविधांगी वाढीला चालना देण्याचे प्रयत्न त्यांनी केले होते. एस्कोटेल ही आता विस्मृतीत गेलेली कंपनी त्यांनी स्थापली होती. उत्तरेतील राज्यांत आणि पुढे केरळमध्ये या कंपनीचा विस्तार झाला, पण तत्कालीन रालोआ सरकारलाच ‘मुठ्ठी में’ करणाऱ्या कंपन्यांमुळे ज्या अनेकांचे कंबरडे मोडले, त्यांपैकी एस्कोटेल अग्रणी ठरली! दशकही पूर्ण न करता ही कंपनी बिर्लाच्या ‘आयडिया’ला विकण्यात आली, तीही तोटा सोसून. सुमारे १२ वर्षांपूर्वी, एस्कॉर्ट समूहाला बसलेला आर्थिक फटका दहा अब्ज रुपयांवर होता. त्यातून सावरण्यासाठी त्यांना ‘एस्कॉर्ट हॉस्पिटल्स’ हे आरोग्य क्षेत्रातील कॉपरेरेट साहसही विकावे लागले आणि त्यातून ‘फोर्टिस’चे फावले. अशाही स्थितीत, ट्रॅक्टर-निर्मितीचा पिढीजात उद्योग मात्र राजन यांनी वाढविलाच. त्या वाढीला कधी दुष्काळाने मर्यादा येत, तर कधी प्रतिकूल सरकारी धोरणांमुळे. खेरीज, ‘फोर्ड’ आणि ‘जेसीबी’ या दोघा भागीदारांनीही एकेक करून साथ सोडल्याने हनुमानउडय़ा घेणे अशक्य ठरले. हे सारे सहन करीत, ट्रॅक्टरच्या विक्रीत सुमारे ३९ टक्क्यांनी वाढ साधण्याची किमया एस्कॉर्टने २०१७-१८ मध्ये करून दाखविली होती.

मैत्रीपूर्ण वागणे हे राजन यांचे वैशिष्टय़. ‘सीआयआय’ या भारतीय उद्योग महासंघाचे ते पदाधिकारी होते, या महासंघाच्या कृषी-उद्योग शाखेचे प्रमुखही होते. आणि याच मनमिळाऊ स्वभावामुळे, ‘एस्कॉर्ट्स’चे गडगंज समभाग खरीदून ही कंपनी खिशातच घालू पाहणाऱ्या स्वराज पॉल यांच्याशी- पॉल यांच्या बंधूंशी- तीन वर्षे वाटाघाटी करीत राहून कंपनीवरील ताबा त्यांनी अबाधित राखला होता.

राजन यांची एक निराळी ओळखही आहे. रुपेरी पडद्यावरल्या दोन बडय़ा अभिनेत्यांचे ते नातेवाईक.. राज कपूर यांची कन्या रितू या त्यांच्या पत्नी, तर अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता ही त्यांची सून!

Story img Loader