रामकुमार यांच्या अनेक चित्रांमध्ये रस्ता, नदी यांची वळणे, जणू वरून पाहिल्यासारखी दिसत. चित्रकार म्हणून आंतरराष्ट्रीय ख्याती आणि भारतीय आधुनिक कलेच्या इतिहासात स्थान मिळवून, तृप्त मनाने १४ एप्रिल रोजी ते निवर्तले. मात्र चित्रकार होण्यापूर्वी १९४८ साली त्यांच्याही आयुष्यात एक मोठे वळण आले होते. दिल्लीच्या विख्यात सेंट स्टीफन्स कॉलेजातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवलेले रामकुमार वर्मा हे त्या वर्षी शारदा उकील यांच्या कलाशाळेत, सैलोझ मुखर्जी यांच्याकडे चित्रकलेचे धडे घेऊ लागले. पुढल्याच वर्षी फ्रान्सच्या दूतावासातर्फे शिष्यवृत्ती मिळवून फर्नाद लेजर आणि आंद्रे ल्होत या खरोखर दिग्गजांच्या हाताखाली ते शिकले आणि त्या दोघांच्या शैलींचा प्रभाव नाकारण्याचे ठरवूनच मायदेशी परतले.
मुंबईत काली पंडोल व केकू गांधी यांच्यासारखे स्नेही त्यांना लाभले. हे दोघेही कलादालन चालवीत, त्यांपैकी पंडोल आर्ट गॅलरीत रामकुमार यांची प्रदर्शने भरू लागली. मुंबईत अनेक चित्रकार मित्र मिळाले. यापैकी मकबूल फिदा हुसेन यांच्यासह १९६० मध्ये ते खास चित्रे काढण्यासाठी गेले. हे गंगाजमनी संस्कृतीची प्रेरणा कैक पिढय़ांना देणारे शहर दोघांनी जणू एकमेकांच्या डोळ्यांनी पाहिले. पुढे सन १९६७ मध्ये हुसेन यांच्यासह त्यांचे प्रदर्शन तत्कालीन एकसंध चेकोस्लोव्हाकियाच्या राजधानीत- प्रागमध्ये भरले. त्यानंतर तीनच वर्षांत, १९७०-७१ मध्ये अमेरिकेची रॉकफेलर शिष्यवृत्ती मिळाल्याने ते त्या देशात जाऊन आले आणि पुढल्याच वर्षी पद्मश्री किताबाचे ते मानकरी ठरले.
तरीही १९९०च्या दशकापर्यंतचा- म्हणजे वयाच्या जवळपास साठीपर्यंतचा त्यांचा प्रवास व्यावसायिकदृष्टय़ा खडतरच होता. लेखन आणि चित्रकला यांतच ते समाधानी होते. नव्वदपूर्व काळातील तो साधेपणा रामकुमार यांनी उत्तुंग व्यावसायिक यश मिळाल्यानंतरही कायम राखला. विख्यात हिन्दी साहित्यिक निर्मल वर्मा हे त्यांचे बंधू; पण दोघांच्या लिखाणातील साम्य आधुनिकतेपुरतेच. रामकुमार यांचे लिखाण व चित्रेही अस्तित्ववादी. हिंदी ललित लेखनाचा पिंड त्यांनी हुस्न बीबी व अन्य कहानियाँ, एक चेहरा, समुद्र, एक लंबा रास्ता आदी कथासंग्रह तसेच दोन कादंबऱ्यांतून जपला. त्यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सम्मान लेखन व चित्रसाधनेसाठी मिळाला; तर त्याआधीच (१९७२) प्रेमचंद पुरस्काराची मोहोर त्यांच्या लेखनगुणांवर उमटली होती. २०११ सालच्या ललित कला अकादमीच्या कारकीर्द-गौरवाने दृश्यकलेच्या इतिहासातील त्यांच्या स्थानावर शिक्कामोर्तब केले होते.