गणितातील प्रत्येक कूटप्रश्नात एक सौंदर्य असते, फक्त त्याचा आस्वाद घेण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे, शिवाय गणित हा असा विषय आहे की, ज्यासाठी कुठली प्रयोगशाळा लागत नाही, त्यासाठी आवश्यक असते एकाग्र मन व तल्लख मेंदू असे महिला गणितज्ञ ही ओ यांचे मत आहे. गणिताच्या प्रांतात महिलांची मुशाफिरी अभावानेच जाणवते. त्याला अपवाद असलेल्यांपैकी त्या एक. त्यांना नुकताच हो अॅम पुरस्कार मिळाला आहे. २ लाख ७५ हजार डॉलर्सचा हा पुरस्कार त्यांना जून महिन्यात प्रदान केला जाणार आहे.
ओ या अमेरिकेतील येल विद्यापीठात ‘अब्राहम रॉबिन्सन प्रोफेसर’ आहेत. दक्षिण कोरियातील ग्वांगजू हे त्यांचे मूळ गाव. सोल राष्ट्रीय विद्यापीठातून बीए केल्यानंतर त्या १९९७ मध्ये ग्रेगरी मारग्विलिस यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी झाल्या व २०१३ मध्ये येल विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापक बनल्या. होमो जिनिअस डायनॅमिक्स, लाय ग्रूप्स व त्यांचे उपयोग, नंबर थिअरी हे त्यांचे संशोधनाचे विषय. भूमिती व अंक सिद्धांतातील अनेक कूटप्रश्न त्यांनी सोडवले.
अपोलोनियन सर्कल पॅकिंगवरचे त्यांचे संशोधन हे मूळ ग्रीक गणितज्ञ अपोलोनियसच्या सिद्धांतावर आधारित आहे. ‘ग्रूप थिअरी, मेजर थिअरी व हायपरबोलिक थिअरी’ या तीन सिद्धांतांचा मिलाफ त्यांनी त्यांच्या संशोधनात घडवला. २०१५ मध्ये त्यांना रूथ लिटिल सॅटर पुरस्कार मिळाला. त्या एएमएस व सिमॉन्स फेलो इन मॅथेमेटिक्स आहेत. खरे तर सुरुवातीला त्या समाजकार्यात उतरल्याही होत्या, पण काही कारणाने पुन्हा गणिताकडे वळल्या. त्यांच्या मते गणितात एखादी गोष्ट चूक किंवा बरोबर अशा दोनच पर्यायांत सिद्ध होते. समाजशास्त्रात कुठल्याही प्रश्नावर एकच एक असे ठोस उत्तर नसते. त्यांच्या एका प्राध्यापकांनी महाविद्यालयात असताना असे सांगितले होते की, गणित हे सुंदर असते. त्यामुळेही त्यांचे गणितप्रेम पक्केझाले ते कायमचे. त्यांनी प्रिन्स्टन, कॅलटेक, ब्राऊन अशा अनेक संस्थांतून काम केले. गणितात अनेकदा छोटय़ा पायऱ्या उकलत जाता येते पण एकदम अडखळल्यासारखे होते. त्यांना चालण्याची आवड आहे. चालता चालता त्यांना एखाद्या गणिती कूटप्रश्नाचे उत्तर सापडते, कारण चालण्याने मन शांत झालेले असते असे त्यांचे म्हणणे आहे. महिलांसाठी गणित हा चांगला मार्ग आहे, त्यात बरीच लवचीकताही आहे; फक्त मुलींमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असल्याने त्या पुरुषांच्या बरोबरीने विचार करू शकत असताना त्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करीत नाहीत, त्यांनी तो जरूर करावा असा त्यांचा तरुण मुलींना सल्ला आहे.