फिलिपाइन्ससारख्या देशाने कृषी क्षेत्रात प्रगती केली; त्यासाठी हातभार लावणारे एक वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणजे रॅमन बार्बा. आंबा उद्योगात त्यांनी जे काम केले त्याला तोड नव्हती. बार्बा यांनी आंब्याचे फळ बारामाही मिळेल अशी व्यवस्था केली! या ख्यातनाम वैज्ञानिकाचे नुकतेच निधन झाले. त्यांनी आंब्याला मोहोर येण्याच्या काळात वाढ घडवून आणली त्यामुळे वर्षांतून तीनदा आंब्याला मोहोर येऊ लागला. बार्बा यांच्या संशोधनाने आंबा उत्पादनात क्रांती झाली. फिलिपाइन्सचा आंबा जागतिक पातळीवर गेला. बार्बा यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९३९ रोजी झाला. फिलिपाइन्स विद्यापीठात असताना त्यांना डॉ. हेलेन लायोसा व्हॅलमेयर यांच्यासारख्या गुरू मिळाल्या त्यामुळे बार्बा हे वनस्पतींच्या रचनाशास्त्राकडे वळले. फिलिपाइन्स विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी कृषी शास्त्रातील पदवीही घेतली. फलोत्पादन हा प्रमुख विषय होता. १९५८ ते १९६० या काळात ते फिलिपाइन्स विद्यापीठाच्या एका कृषी महाविद्यालयात प्रशिक्षक होते. पुढे जॉर्जिया विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीवर अमेरिकेत त्यांनी फळझांडाना मोहोर कसा येतो यावर अभ्यास करताना गिब्रेलिक अ‍ॅसिड व पोटॅशियम नायट्रेट यांचा वापर केला. जॉर्जिया विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर हवाई येथे त्यांनी वनस्पतीशास्त्रात डॉक्टरेट केली. नंतर काही काळ त्यांनी अमेरिकेतही अध्यापन केले. खासगी संस्थात ते सल्लागार होते. आंब्याला तीनदा मोहोर येण्यासाठी त्यांनी एथेरेल या रसायनाचा वापर केला. पण त्यांना चाचण्यांसाठी परवानगी मिळाली नाही. एथेरेल व पोटॅशियम नायट्रेट यांच्या वापराचा त्यांचा आग्रह होता. अखेर क्विमारा फार्म येथील जोस क्विमसन यांनी त्यांच्या शेतात आंब्याच्या चारशे झाडांवर हा प्रयोग केला व पोटॅशियम नायट्रेटचा वापर करून त्यांनी आंब्याला मोहोर आणण्यात यश मिळवले. बार्बा यांनी या संशोधनाचे पेटंट घेतले पण जगभरातील आंबा उत्पादकांना हे तंत्र मोफत दिले. त्यातून फ्लश हे संप्रेरक मोहोर आणण्यासाठी वापरला जाऊ लागले. बार्बा यांनी उती संवर्धनाच्या प्रक्रिया शोधून केळीच्या उत्पादनातही वाढ केली. केळी कुठलाही रोग न होता उत्पादित होऊ लागली. उसासाठीही त्यांनी उती संवर्धन पद्धत वापरून उसाच्या चांगल्या प्रजाती निर्माण केल्या. त्यांनी फळझाडांच्या एकूण ४० प्रजातींवर तसेच, जंगली व सागरी वनस्पतींवरही प्रयोग केले. काजूच्या पिकावर त्यांनी यशस्वी प्रयोग करून उत्पादन वाढवले. त्यांच्या या संशोधनातून रसायन निर्माते. विक्रेते यांना फायदा झाला. फिलिपाइन्सचे राष्ट्रीय वैज्ञानिक हा सन्मान त्यांना २०१३ मध्ये मिळाला. त्यांच्या निधनाने फळझाडांचे उत्पादन वाढवणारा एक कर्मयोगी काळाच्या पडद्याआड गेला आहे.

Story img Loader