ओदिशातील चित्रपटसृष्टीवर काही दशके राज्य करणाऱ्या अभिनेत्री व त्या राज्यातील पहिल्या महिला निर्मात्या व दिग्दर्शक पार्बती घोष यांच्या निधनाने एक मंतरलेला काळ पडद्याआड गेला आहे. पार्बती ऊर्फ चंदना यांनी त्यांच्या अभिनय नैपुण्याने एक मापदंडही निश्चित केला. त्यांच्याकडे अंगभूत आरस्पानी सौंदर्य तर होतेच, त्याच्या जोडीला कलागुणांचीही देणगी त्यांना लाभली होती. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका संस्मरणीय तर होतीच, शिवाय त्याला समर्थ अभिनयाची जोड होती. याच कलाक्षेत्रात गौर प्रसाद घोष यांच्यासमवेत पडद्यावर जमलेली जोडी प्रत्यक्ष वास्तवातही प्रेमकथेमुळे सुरेख जमली.

कलाकार जोडीदारासोबत त्यांची कलाही नव्याने फुलत गेली. त्यांची अभिनयाची आवडही तशी शालेय जीवनातच जोपासलेली. त्यांचे आई-वडील त्यांच्यातील कलाकाराच्या आड कधीच आले नाहीत. त्यांचा जन्म कटकचा. त्यांचे वडील छापखाना व्यवस्थापक होते. त्यांच्या छापखान्यात कान्हू चरण मोहंती व गोपीनाथ मोहंती यांच्यासारख्यांच्या अनेक साहित्यकृती छापल्या गेल्या व गीतेचे ओदिशी भाषांतरही प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे साहित्याशीही त्यांची जवळीक होती. शाळेत असतानाच त्यांनी सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमात भाग घेतला. केलुचरण महापात्रा, दयाळ शर्मा व सुरेश राऊतराय यांनी त्यांना ओदिशी नृत्याचे धडे दिले. नंतर आकाशवाणीवर त्यांनी ‘अ’ दर्जाचे कलाकार म्हणून काम केले. नीला माधव या पात्राची पहिली भूमिका त्यांनी ‘श्री जगन्नाथ’ या चित्रपटात साकारली. त्यात राय गौर हे शक्तिधराच्या भूमिकेत होते. हा चित्रपट गाजल्याने पार्बती यांची यशोगाथा सुरू झाली. ‘अमारी गान’ हा त्यांची प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट. बालविवाह हा त्याचा विषय होता. ‘भाई भाई’ हा त्यांची निर्मिती असलेला पहिला चित्रपट, त्यात त्यांची भूमिकाही होती. त्यांच्या लक्ष्मी, का, स्त्री, संसार या चित्रपटांनी अनेक पुरस्कार पटकावले. दूरचित्रवाणी मालिका, नभोनाटय़े यात त्यांनी काम केले. १९७७ मध्ये त्यांनी ‘अमर प्रेम’ हा चित्रपट केला. नंतर ‘समाधान’, ‘हॉकर’ या मालिका त्यांनी दूरदर्शनसाठी केल्या. नंतर ‘प्रश्न’ व ‘सोपान’ या दोन दूरचित्रवाणी चित्रपटांत भूमिका केल्या. सारिया पुरा रा सानिया या इंदू भूषण मिश्रा यांच्या संगीत चित्रफितीत त्यांनी काम केले. ती सामान्य लोकांना भावली. ‘सलाबेग’ या माहितीपटात सात्यकी मिश्रा यांनी जगन्नाथाच्या मुस्लीम भक्ताची भूमिका केली, त्याचे दिग्दर्शन पार्बती यांनी केले.  पुरा पुरी परबरिका, परीबर्तन, प्रतिभा या माहिती व चरित्रपटांनी त्यांचे नाव गाजले. त्यांचे विशेष म्हणजे त्यांनी बोलीभाषांतही निर्मिती केली, त्यात सामाजिकतेचे भान ठेवले.

((  पार्बती घोष  ()))

Story img Loader