मूळ मालिकेच्या बऱ्याच उशिराने म्हणजे ऐंशीच्या दशकात दूरदर्शनवर दाखल झालेल्या ‘स्टारट्रेक’ मालिकेचे देशी योगदान काय, तर त्यातील प्रभावाने काडेपेटय़ा रबराला जोडून एक खेळणे गल्लोगल्ली तयार व्हायला लागले. कथानक आकाशगंगेमध्ये चालणाऱ्या या मालिकेतील मिस्टर स्पॉक हे लोकप्रिय पात्र त्याच प्रकारच्या एका खेळण्यातून संवाद साधत होते. पुढे मोबाइल वगैरे येण्याची कल्पना आकारालाही येण्याआधी दीड-दोन दशके संवादाचे हे यंत्र स्ट्रारट्रेकमध्ये लोकांनी अनुभवले. या सायन्स फिक्शन मालिकेने अंतराळ दृश्यांचे रूप जगभरच्या प्रेक्षकांसमोर धरले.
मात्र त्याच्या आरंभाची कहाणी सोपी नव्हती. एनबीसी वाहिनीने ती मालिका सुरू करण्यापूर्वी त्याचे प्रस्तावित दोन भाग नाकारले. अशा प्रकारच्या अंतराळात घडणाऱ्या वगैरे मालिकेला प्रेक्षक न मिळण्याच्या भीतीने पहिले दोन्ही भाग नाकारून या मालिकेचा आरंभ अडवून धरला. या पाश्र्वभूमीवर एका कथा-कादंबरी लिहिणाऱ्या बऱ्यापैकी नाव असलेल्या व्यक्तीला पहिल्या भागाच्या निर्मितीसाठी पाचारण करण्यात आले. त्याने लिहिलेला भाग टीव्ही कंपनीकडून तातडीने स्वीकारला गेला आणि ‘स्टारट्रेक’ मालिकेचा लौकिकार्थाने जन्म झाला. मालिकेची नांदी यशस्वीरीत्या घडून आणलेल्या लेखकाचे नाव होते जॉर्ज क्लेटन जॉन्सन. हॉलीवूडमध्ये १९८०-९० च्या दशकांवर पटकथाकार म्हणून राज्य करणाऱ्या विल्यम एफ नोलन, रे ब्रॅडबरी आणि रिचर्ड मथिसन यांच्या पंक्तीत गणल्या गेलेल्या जॉर्ज जॉन्सन यांनी इतरही अनेक सिनेमा आणि मालिकांचे लेखन केले.
मंदीच्या काळातला जन्म, विघटित कुटुंब यांच्या दैनेत बूट पॉलिश करणाऱ्या पोऱ्यापासून सैन्यात दाखल होणाऱ्या आणि तिथल्या शिक्षणातून पुढे लेखक बनण्याचा चमत्कार घडविणाऱ्या जॉर्ज क्लेटन जॉन्सन यांच्या आयुष्याची कहाणीही वाकडय़ा वळणांनीच स्थिर झालेली म्हणावी लागेल. आल्फ्रेड हिचकॉक प्रेझेंटमधील कथा, ट्वायलाइट झोन, कुंग फू आदी मालिकांचे लेखन यासोबत ‘ओशन इलेव्हन’ ही दरोडेकथा त्यांनी लिहिली. ओशन चित्रपटांची जुनी आणि गेल्या दशकात सोडरबर्गने तयार केलेली तिकीटबारीवीर मालिका यांच्यामागेही त्यांचीच लेखणी होती.
त्यांच्या नुकत्याच झालेल्या मृत्यूनंतर वृत्तमाध्यमांनी स्टार ट्रेकच्या पहिल्या भागाचा नियंता, एवढाच गौरव करून त्यांच्या इतर लेखनकार्याबाबत सांगताना कंजुषी केली. अर्थात जोवर स्टारट्रेक या नावाचे अस्तित्व राहील तोवर याच अतिसंक्षिप्त परिचयाची पुनरावृत्ती पुसता येणार नाही, हे खरेच.

Story img Loader