वयाची शंभरी उलटूनही पहाटे चार वाजता उठून कोलकात्यातील रिपन स्ट्रीटवर फिरायला जाण्याचा त्यांचा नेम चुकला नाही. सकाळी पाच वाजता ते रुग्णांना तपासण्यासाठी जात. दुपापर्यंत शंभरेक रुग्णांवर रोज ते मोफत उपचार करीत, तरीही कुठला गाजावाजा नाही. अत्यंत शांत व्यक्तिमत्त्व, त्यांची राष्ट्रभक्तीही तशीच मोठी. गांधीजींबरोबर ते दांडीयात्रेला गेले होते. त्याची गोष्ट सांगताना या वयातही त्यांच्या चेहऱ्यावर फुलणारे हास्य त्याची साक्ष देणारे. या तरुण वृद्धाचे नाव सय्यद महम्मद शरफुद्दीन काद्री. लोकांना ते हकीमसाहब म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाने असंख्य लोकांचा हक्काचा डॉक्टर गेला आहे.
त्यांनी वयाची ११४ वर्षे सहज पूर्ण केली होती. त्यांचे वडील तर १२१ वर्षे जगले. त्यांनीच हकीमसाहेबांना दीर्घायुष्याचा कानमंत्र दिला. ते युनानी डॉक्टर तर होतेच पण या वैद्यक शाखेसाठी त्यांनी युनानी वैद्यकीय महाविद्यालयही स्थापन केले होते. बिहारहून त्यांचे कुटुंबीय १९३० मध्ये कोलकात्यात आले, त्याआधीच वडीलही स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले होते. गांधीजींच्या दांडीयात्रेची आठवण त्यांच्यासाठी मोलाची ठेव. ‘‘तो सोनेरी काळ होता. त्या वेळी महात्मा गांधींबरोबर मी दांडीयात्रेत होतो. नंतर काही दिवस महात्माजींबरोबर कटकच्या तुरुंगातही होतो,’’ असे ते मोठय़ा अभिमानाने सांगत. अशा कृतार्थ जीवनाचा गौरव भारत सरकारतर्फे, २००७ सालात ‘पद्मभूषण’ किताबाने झाला.
एकदा मौलाना अबुल कलाम आझाद हजारीबाग येथील रामगड येथे (आता झारखंडमध्ये) सभेसाठी आले होते. हकीमसाहेबही त्या सभेला काही निमित्ताने हजर होते. त्या वेळी अचानक पाऊस आला तसे लोक आडोशाला पळू लागले. तेव्हा आझाद म्हणाले होते, ‘अरे पाऊस आला म्हणून पळता, जर ब्रिटिशांच्या गोळ्या बरसू लागल्या तर असेच पळणार का..’ आझादांचे ते बोलणे त्यांच्या मनावर कायमचे ठसले! जाज्वल्य राष्ट्रभक्तीचे संस्कार ते कधीच विसरले नाहीत. आजच्या नेत्यांपैकी नितीशकुमार यांच्याविषयी त्यांना नितांत आदर. हा माणूस बिहारमध्ये काही तरी जादू नक्की करेल असे ते म्हणायचे. लालूप्रसादांविषयी ते बोलण्याचे टाळत.
ते पद्मभूषण होते पण सामान्यांचे हकीमसाहेब होते. मला केवळ हकीम म्हणा असेच ते लोकांना सांगत. लोकांचे प्रेम मिळवण्यात ते यशस्वी झाले होते.