गडवाल, नारायणपेट, पोचमपल्ली या गावांनी शतकानुशतके वस्त्र-विणकामाच्या परंपराही जपल्या; म्हणून आजही साडीच्या दुकानात या गावांशी नाते सांगणाऱ्या साडय़ा मिळतात. निजाम असो की टिपू सुलतान, त्यांनी या परंपरांना नख लावले नाही! निजामाच्या काळात तर हिमरू आणि मशरू या वस्त्रपरंपराही रुजल्या, औरंगाबादपर्यंत गेल्या. पण ब्रिटिशांच्या वरवंटय़ापुढे अशा अनेक परंपरांची पूर्वापार बौद्धिक संपदा एकतर लयालाच गेली किंवा ‘आधुनिक’ होण्याच्या नादात स्वत्त्वच विसरली. यापैकी हिमरू आणि मशरू परंपरांचे पुनरुज्जीवन करण्याचा मान सुरैया हसन बोस यांचा. ‘तेलिया रुमाल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, अंगभर असंख्य चौकोनांत इकतच्या फुलांची तिरंगी बहार उडवून देणाऱ्या साडय़ांचा जुना डौल जपण्याचे श्रेयही त्यांचे. शंभरावर जुन्या नक्षींचे आलेख त्यांनी शोधले आणि आपल्या हातमागांवर विणून घेतले. या सुरैया बोस यांचे निधन गेल्या आठवडय़ात (३ सप्टेंबर) निधन झाले.
मूळचे उत्तर प्रदेशातल्या इटावा येथील असलेले त्यांचे कुटुंब १८७४ पासूनच हैदराबादला आले. वडिलांचा व्यवसाय ग्रंथविक्रीचा, पण गांधीजींच्या चळवळीकडे ओढले गेल्याने भर निजामी मुलखात खादीविक्रीचेही दुकान त्यांनी काढले. पुरोगामी कुटुंबातली मुलगी म्हणून सुरैया यांना १९४०च्या दशकात त्यांच्या इच्छेप्रमाणे, केम्ब्रिजला जाऊन वस्त्रकलेचे शिक्षण घेता आले. मायदेशी परतल्या तेव्हा स्वातंत्र्याची पहाट होत होती. आपल्या अनेकानेक वस्त्रपरंपरा हाही विविधतेतील एकतेचा वारसाच आहे, ही जाणीव नुकती मूळ धरू लागली होती. पण, ‘खादी’चे ‘ब्रिटिशविरोधी निदर्शनकारी’ स्वरूप स्वातंत्र्यसूर्यासह अस्ताला जाणार होते. पुपुल जयकर व कमलादेवी चट्टोपाध्याय या दोघींच्या निमंत्रणावरून सुरैया दिल्लीत आल्या. ‘हॅण्डलूम अॅण्ड हॅण्डिक्राफ्ट्स एक्स्पोर्ट कॉपरेरेशन’ या निमसरकारी संस्थेत, वस्त्रतज्ज्ञ म्हणून त्यांनी काम सुरू केले. देशभरच्या वस्त्रपरंपरांचे स्वत्त्व टिकवून त्यांचे उत्पादन वाढवणे, जरूर तेथे आधुनिकीकरण करणे, हे त्यांचे काम. याच काळात अरबिंदो बोस (नेताजी सुभाषचंद्रांचे पुतणे) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. दोन दशके दिल्लीत काम करताना अनेक विदेशी फॅशन डिझायनरांनाही त्यांनी भारतीय वस्त्रांविषयी मार्गदर्शन केले होते. १९७२ नंतर हैदराबादेस परत येऊन, इथल्या जुन्या विणकरांसह त्या काम करू लागल्या. आठ पायटय़ांचे हिमरू माग अवघे १२ उरले होते, त्यांची संख्या त्यांनी वाढवली. १९८५ पासून स्वत:चा हातमागखाना काढला व तेथे पैठणी परंपरेचेही जुने प्रकार जपले! ‘फॅबिंडिया’वर पुस्तक लिहिणाऱ्या राधिका सिंग यांनी सुरैया यांचे ‘वीव्हिंग अ लीगसी’ हे चरित्र लिहिले आहे.