नेतृत्व हा गुण फक्त राजकारणातच आवश्यक असतो असे नाही, तर शिक्षण क्षेत्रातही त्याची गरज आहे. परदेशातील विद्यापीठात असे अनेक भारतीय लोक मोठे काम करीत आहेत, त्यातील एक नाव म्हणजे हरगुरदीप (दीप) सिंग सैनी. अलीकडे त्यांची ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून निवड झाली आहे.

शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्ती व वनस्पतिशास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख. लहान असताना वडिलांच्या बदल्यांमुळे त्यांचे शिक्षण सतत अडथळ्यांची शर्यत होती. पंजाबी लोक परदेशात नाव कमावून आहेत, पण शिक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या मोजक्या पंजाबी लोकांपैकी ते एक. त्यांचा जन्म पंजाबमधील पठाणकोटमधील          भाथवला या गावचा. ‘कठोर परिश्रमाला पर्याय नसतो,’ हे थॉमस अल्वा एडिसनचे वाक्य त्यांनी आदर्श ठेवले. शिक्षण पंजाब व हिमाचल प्रदेशात झाले. त्यांचे वडील वनखात्यात होते त्यामुळे नेहमी बदल्या ठरलेल्या. सैनी १९७२ मध्ये पंजाब कृषी विद्यापीठातून बी.एस्सी. झाले. या विद्यापीठाचा हरितक्रांतीत मोठा सहभाग होता. नंतर रणबीर कौर कांग म्हणजे राणीच्या ते प्रेमात पडले; ती होम सायन्सची विद्यार्थिनी. ऑस्ट्रेलियात जाण्यापूर्वी त्यांचा विवाह झाला, नंतर १९८२ मध्ये ते कॅनडात गेले. वॉटर्लू विद्यापीठात प्राध्यापक होण्यापूर्वी ते माँट्रियल विद्यापीठात संशोधन करीत होते. अ‍ॅडलेड विद्यापीठातून त्यांनी वनस्पती विज्ञानात पीएच.डी. केली. कॅनबेरा विद्यापीठात येण्यापूर्वी ते टोरांटो विद्यापीठाचे उपाध्यक्ष होते.

कॅनडातील एका प्रतिष्ठित विद्यापीठात काम करताना त्यांनी संशोधनावर भर देतानाच इंग्रजी, फ्रेंच, हिंदूी व पंजाबी या भाषांवर प्रभुत्व मिळवले. टोरांटोत त्यांना पूर्ण स्वायत्तता मिळाली. एकूण १४ विभाग, १४९ अभ्यासक्रम, ११,४३० विद्यार्थी व ७०० प्राध्यापक एवढा पसारा त्यांनी सांभाळला होता. कॅनडासारख्या बहुसांस्कृतिक देशातून आल्याने त्यांना शिक्षण व प्रशासनातील जास्त व्यापक अनुभव आहे. कॅनडातील विद्यापीठातून कारकीर्द सुरू केली, तेव्हा तुम्ही आशियाई लोक आमच्या नोकऱ्या हिसकावता, त्यामुळे तुम्ही परत जा अशा घोषणा तेथील विद्यार्थ्यांनी दिल्या होत्या. पण सैनी शांत स्वभावाचे. मी भारतात परत जायला तयार आहे पण त्यासाठी तुम्हीही तुमच्या मूळ  देशात परत जायला तयार असले पाहिजे एवढेच ते म्हणाले. आम्ही जर हजारो मैलांवरून येऊन तुमच्या नोक ऱ्या हिसकावत असू तर त्याचा दुसरा अर्थ तुम्हाला मेंदू किंवा डोकेच नाही असा होत नाही का, असा सवालही त्यांनी केला.

सध्या आपल्याकडे विद्यापीठांमध्ये राजकीय हस्तक्षेपाच्या नावाने शिमगा चालू आहे, त्याबाबत ते म्हणतात की, विद्यापीठांमध्ये शिक्षक राजकीय नेत्यांचे हारतुरे देऊन स्वागत करीत असतात पण ते योग्य नाही, भारतीय विद्यापीठांना स्वायत्तता दिली पाहिजे.