आजच्या संदर्भात इतिहासाचा अन्वयार्थ कसा लावायचा, याचा विचारव्यूह गेल्या तीन-चार दशकांत आंतरराष्ट्रीय पातळीवर विकसित झाला आहे. भारतातही या विचारव्यूहाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या इतिहास-अभ्यासकांची एक फळी याच काळात तयार झाली. त्यापैकी एक असलेले इतिहासकार हरिशंकर वासुदेवन यांचे करोनामुळे निधन झाल्याची वार्ता पश्चिम बंगालमधून रविवारी आली अन् देशभरातल्या अकादमिक वर्तुळातून हळहळ व्यक्त झाली. मल्याळी कुटुंबात जन्मलेल्या वासुदेवन यांचे वडील अभियंता होते, तर आई प्राध्यापक. त्यांच्या जडणघडणीचा काळ युरोप-आफ्रिकेतही गेला. सुरुवातीचे शिक्षण भारतात घेऊन, पुढे १९७८ मध्ये केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली. त्यानंतर कोलकाता विद्यापीठात व्याख्याते म्हणून युरोपीय इतिहास शिकवू लागलेले वासुदेवन पुढे तिथेच सुप्रतिष्ठ प्राध्यापक झाले. इतिहासअभ्यासाची रुजवण करण्यासाठी त्यांनी संस्थात्मक कार्यातही स्वत:स गाडून घेतले. कोलकाता असो वा दिल्ली, वासुदेवन यांचा राबता बहुव्यापी होता. नवोदित इतिहास अभ्यासक, विद्यार्थी या साऱ्यांसाठी ते औपचारिकतेची बंधने ओलांडून ‘हरी’ झाले आणि तोच जिव्हाळा त्यांना मल्याळी मूळ असूनही बंगाली भद्रलोकांत स्थान देऊन गेला. दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठात मध्य आशियाविषयक अभ्यासप्रकल्प सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता, तसेच भारत सरकारच्या मौ. अबुल कलाम आझाद इन्स्टिटय़ूट ऑफ एशियन स्टडीज्चे संचालकपदही त्यांनी भूषविले होते. बंगालमधील आदल्या पिढीचे इतिहासकार आर. सी. मजुमदार यांच्या निवासस्थानी संग्रहालयवजा संशोधन केंद्र उभे करण्याच्या प्रकल्पात ते अलीकडे व्यग्र होते. पण या साऱ्यात २००५ साली एनसीआरटीईच्या सामाजिकशास्त्रे पाठय़पुस्तक निर्मिती समितीचे प्रमुख म्हणून त्यांची कामगिरी महत्त्वाची ठरली. भारताच्या इतिहासाचे आकलन राष्ट्रवादी दृष्टिकोनातून करायचे की विकेंद्रीतदृष्टय़ा त्याकडे पाहायचे, हा कळीचा मुद्दा त्यांनी त्या वेळी धसास लावला होता. त्यांच्या नेतृत्वाखालील त्या समितीने निर्मिलेली पाठय़पुस्तके ही राष्ट्रीय अभ्यासक्रम कसा असावा, याचा वस्तुपाठ आहेत. सोळाव्या शतकात भारतात आलेल्या रशियन व्यापाऱ्याच्या अनुषंगाने भारत-रशिया संबंधांचा वेध घेणारे ‘इन द फूटस्टेप्स ऑफ अफानसी निकितिन’, तसेच या दोन देशांतील व्यापारी व लष्करी सहकार्याचा इतिहास सांगणारे ‘श्ॉडोज् ऑफ सबस्टन्स’ अशा पुस्तकांसोबत त्यांनी अनेक पुस्तकांचे संपादनही केले. आपल्या आईच्या आठवणींवरील पुस्तकाचे प्रकाशन होण्याआधीच ते निरोप घेते झाले.
हरी वासुदेवन
आजच्या संदर्भात इतिहासाचा अन्वयार्थ कसा लावायचा, याचा विचारव्यूह गेल्या तीन-चार दशकांत आंतरराष्ट्रीय पातळीवर विकसित झाला आहे. भारतातही या विचारव्यूहाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या इतिहास-अभ्यासकांची एक फळी याच काळात तयार झाली. त्यापैकी एक असलेले इतिहासकार हरिशंकर वासुदेवन यांचे करोनामुळे निधन झाल्याची वार्ता पश्चिम बंगालमधून रविवारी आली अन् देशभरातल्या अकादमिक वर्तुळातून हळहळ व्यक्त झाली. मल्याळी कुटुंबात जन्मलेल्या वासुदेवन यांचे […]
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-05-2020 at 00:01 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hari vasudevan profile abn