भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांना अनेक देशांत सेवेची संधी मिळते, पण अमेरिकेसारख्या बलाढय़ देशात नोकरी करण्याची संधी काही निवडक लोकांनाच मिळते. हे पद अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्रारंभीच्या काळात के असफ अली, विजयालक्ष्मी पंडित, एम सी छागला, अलियावर जंग, टी एन कौल, नानी पालखीवाला, करण सिंग.. अशा मातब्बर आणि अभ्यासू मंडळींना हे पद भूषवण्याची संधी मिळाली. नंतर ललित मानसिंग, रौनेन सिंग, मीरा शंकर ते आताचे नवतेज सरना.. या अधिकाऱ्यांनी भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणून वेगवेगळ्या अध्यक्षांच्या काळात काम केले आहे. आता याच पंगतीत जाण्याचा मान हर्षवर्धन शृंगला यांना मिळाला आहे. गेल्याच महिन्यात त्यांची या पदावर नियुक्ती झाली असून आज, शुक्रवारी ते आपल्या पदाची सूत्रे हाती घेण्याची शक्यता आहे.
परराष्ट्र सेवेतील अत्यंत हुशार आणि कर्तबगार अधिकारी अशी त्यांची ओळख असून विविध पदांवर काम करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. राजधानी दिल्लीतील विख्यात सेंट स्टीफन्स कॉलेजचे पदवीधर असलेल्या शृंगला यांनी काही वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रांत काढली. पण तेथील कामात त्यांचे मन काही रमले नाही. इंग्रजी साहित्याचे अफाट वाचन असल्याने मग त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले. त्यांच्या मित्रपरिवाराने आयएएस केडरच घे, असे सांगितले असतानाही त्यांनी आव्हाने स्वीकारण्यासाठी परराष्ट्र सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. १९८४च्या तुकडीतील ते अधिकारी आहेत. गेल्या ३४ वर्षांत त्यांनी पॅरिस, तेल अवीव, हनोई, थायलंड, संयुक्त राष्ट्रे, युनेस्को, व्हिएतनाम, इस्रायल, द आफ्रिका आदी ठिकाणी महत्त्वाच्या आणि संवेदनशील जबाबदाऱ्या कौशल्याने पार पाडल्या. परराष्ट्र खात्याच्या दिल्ली येथील कार्यालयात नेपाळ, भूतान आणि प युरोपसाठीच्या विभागांत संचालक आणि उपसचिव पदांवर त्यांनी काम केले. विविध देशांतील अंतर्गत संघर्ष आणि त्यांची अर्थव्यवस्था याचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. या विषयांवर जगभरातील अनेक नियतकालिकांत ते सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन करत असतात. इंग्रजी, हिंदी, संस्कृत अशा अनेक भारतीय भाषा त्यांना येतातच पण विदेश सेवेमुळे त्यांनी फ्रेंच, व्हिएतनामी आणि नेपाळी भाषाही शिकून घेतल्या आहेत. अमेरिकेचे राजदूत होण्यापूर्वी ते बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकीर्दीची दोन वर्षे संपली असून पुढील दोन वर्षे भारतासाठी महत्त्वाची आहेत. अशा काळात शृंगला हे तेथे नियुक्त झाल्याने त्यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे.